करोना साथरोगाची तीव्रता आटोक्यात आल्यानंतर करोना प्रतिबंधात्मक लसीकरणावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. राज्यातील तब्बल पाच कोटी १४ लाख १९ हजार ६१४ नागरिकांनी करोना लशीच्या तिसऱ्या किंवा वर्धक मात्रेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. यामध्ये सात लाख २९ हजार ३२३ आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, करोना साथरोग अद्याप संपलेला नसल्याने वर्धक मात्रा घेण्याबाबत टाळाटाळ न करण्याचे आवाहनही अभियानातर्फे करण्यात आले आहे.

वर्धक मात्रा सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर मोफत –

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त करोना विषाणू प्रतिबंधात्मक लशीची वर्धक मात्रा सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर मोफत देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून नुकतेच देण्यात आले आहेत. त्याबाबत माहिती देतानाच वर्धक मात्रा तसेच करोना लशीची दुसरी मात्रा न घेतलेल्या लोकसंख्येबाबत माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोफत वर्धक मात्रा लसीकरण मोहिमेत अधिकाधिक नागरिकांना लस देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. १८ वर्षांवरील नागरिकांनी करोना लशीची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाले असल्यास त्यांना वर्धक मात्रा दिली जावी, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

करोना लशीच्या वर्धक मात्रेकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांमध्ये सात लाख २९ हजार ३२३ आरोग्य कर्मचारी आहेत. १३ लाख ४२ हजार ८१३ नागरिक हे इतर आघाडीच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत (फ्रंट लाईन वर्कर) आहेत. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सर्वाधिक दोन कोटी ८८ लाख ३५ हजार ७२९ जणांनी वर्धक मात्रा घेतलेली नाही. ४५ ते ५९ वर्ष वयोगटामध्ये ही संख्या एक कोटी ३१ लाख २४ हजार ६६३ एवढी आहे. साठ वर्षांवरील गटातील ७३ लाख ८७ हजार ०८६ जणांनी अद्याप वर्धक मात्रा लसीकरण पूर्ण केलेले नाही. मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील वर्धक मात्रा लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे जिल्ह्यातील ४४ लाख ३९ हजार १६७ जणांनी वर्धक मात्रा घेतलेली नाही. मुंबईत ७२ लाख ४९ हजार ५१७ जणांनी तर पुणे जिल्ह्यातील ५९ लाख एक हजार ९३४ जणांनी वर्धक मात्रा अद्याप घेतलेली नाही.

यांची दुसरी मात्राही शिल्लक –

देशात बीए.४ आणि बीए.५ या ओमायक्रॉन विषाणू प्रकारामुळे करोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांना करोना लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र अद्याप एक कोटी ७५ लाख सात हजार ५२८ जणांनी लशीची दुसरी मात्राच घेतली नसल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.