सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीनजीक भीमाशंकर येथे मालमोटार आणि टँकर यांची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात दोन्ही वाहनचालकांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा प्रवासी जखमी झाले. अपघातस्थळी नादुरूस्त रस्त्यामुळे हा अपघात झाला असून याप्रकरणी संबंधित दोन्ही रस्ता ठेकेदारांसह मृत वाहनचालकांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

उजनी धरणासमोर भीमानगरच्या पुलाजवळ चौपदरी रस्ता नादुरूस्त असल्यामुळे दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. परंतु रस्ता दुरूस्त करताना तेथे कोणत्याही प्रकारच्या सावधानतेचा किंवा दिशा दर्शक फलक लावण्यात आला नाही. तसेच त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असताना त्यावर योग्य नियंत्रण करणारी यंत्रणा देखील सक्रिय दिसत नाही. त्यातूनच दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन छोट्या-मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळते. काल रात्री साडेअकराच्या सुमारास मालवाहक व टँकरचा अपघात झाला. तांदूळ वाहतूक करीत सोलापूरहून पुण्याकडे निघालेला मालवाहक टेंभुर्णीच्या पुढे भीमानगर येथे नादुरूस्त असलेला रस्ता ओलांडताना समोरून-पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या टँकरची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनचालकांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. 

मालमोटारचालक शिवाजी नामदेव पवार व टँकरचालक संजय शंकर कवडे (रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यासह मालमोटारीतून प्रवास करणाऱ्या व्यंकट दंडघुले (रा. सालेगाव, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) आणि अन्य दोघे अनोळखी प्रवासी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर दत्ता अशोक घंटे (वय २४, रा. सालेगाव, ता. लोहारा), व्यकूसिंह रतनसिंह राजपूत (वय ६६, रा. केसरजवळगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), गौरी दत्ता राजपूत (वय ३३, रा. पुणे), तिची मुले धीरज (वय १२) व मीनल (वय ४) आणि सुलोचना गोटूसिंह राजपूत (रा. पुणे) हे सहाजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इंदापूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात मालवाहक पालथी झाल्याने रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सूरज निंबाळकर यांनी अपघातस्थळी भेट देऊन घटनास्थळाचे निरीक्षण केले.

दरम्यान, कृष्णदेव कांतीलाल केदार (वय २५, रा. कन्हेरगाव, ता. माढा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही वाहनचालकांसह तेथील रस्ते कामाचे ठेकेदार आणि रस्ता दुरूस्ती व देखभाल करणारे ठेकेदार यांच्याविरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत.