संपत्तीच्या वादातून कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

प्रवीण वल्लमशेटवार कवानकर यांनी पत्नी, दोन मुली व एका मुलासह सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून आत्महत्या

(संग्रहित छायाचित्र)

मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संपत्तीच्या वादाला कंटाळून प्रवीण वल्लमशेटवार कवानकर यांनी पत्नी, दोन मुली व एका मुलासह सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. गुरुवारी प्रवीण यांचा मृतदेह सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संपत्तीच्या वादातूनच संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली असल्याच्या वृत्तास अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी दुजोरा दिला.

हदगाव तालुक्यातील कवाना येथील मूळ रहिवासी असलेले भगवानराव वल्लमशेटवार कवानकर यांचे  शहरात घाऊक किराणा दुकान आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या दोन मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता. या वादातूनच आठ  दिवसांपासून त्यांचे किराणा दुकान बंद होते. त्यांच्या नातेवाइकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्यातील संपत्तीचा वाद विकोपाला गेला होता. मंगळवारी प्रवीण कवानकर (वय ४२) हे आपली पत्नी अश्विनी (वय ३८), मोठी मुलगी सेजल (वय २०), लहान मुलगी समीक्षा (वय १४) आणि मुलगा रिद्धेश (वय १३) हे सर्व जणं नांदेडकडे जातो म्हणत घरून निघाले; परंतु त्यांनी भाडय़ाची टॅक्सी करून थेट सहस्त्रकुंड गाठले आणि त्याचदिवशी या पाचही जणांनी धबधब्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली असावी, असा कयास पोलिसांनी वर्तविला.

सहस्त्रकुंड धबधबा हा यवतमाळ आणि नांदेडच्या सीमेवर आहे. प्रवीण यांचा मृतदेह इस्लापूर, अश्विनी आणि रिद्धेश यांचा मृतदेह दराडी येथे आढळून आला. अद्यापही सेजल आणि समीक्षा या दोघींचे मृतदेह सापडले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सेजल ही बीडीएसचे शिक्षण घेत होती.

प्रवीण यांच्या खिशात मोबाइल सापडला असून त्यातील सीमकार्डच्या आधारे पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटविली आहे. इस्लापूर पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना बोलावून मृतदेहांची खात्री पटवली. संपत्तीच्या वादाप्रकरणी यापूर्वी पोलीस स्थानकात कोणतीही फिर्याद दाखल नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Five members of a family commit suicide over a property dispute abn

ताज्या बातम्या