सातारा: शहरानजीक असलेल्या दौलतनगर येथील शानबाग विद्यालयाच्या इमारतीवर असलेल्या मधमाश्यांनी नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर व तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
दौलतनगर येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या शानबाग शाळेच्या इमारतीवर तीन मोठी आगे माश्यांचे पोळे आहेत. या मधमाश्यांमुळे गेल्या तीन वर्षांत छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत.
सोमवारी दुपारी या रस्त्यानजीक ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे नागरिकांची पळापळ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात मधमाश्यांनी पाच जणांचा चावा घेतला. यामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मधमाश्यांच्या हल्ल्यात अनिल शेळके, आनंद यादव, मच्छिंद्र ननावरे, राजेंद्र यादव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.दरम्यान, या शाळा इमारतीवरील आगे माश्यांचे पोळे हटवून येथील विद्यार्थी व नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.