गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवादी व पोलिसांमध्ये मागील नऊ महिन्यांत झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांची कसरसूर उपकमांडर ज्योती गावडे हिच्यासह पाच महिला व दोन पुरुष असे एकूण सात नक्षलवादी ठार झाले. गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने अतिशय कल्पकतेने नक्षल अभियान राबविल्याने हे यश मिळाले आहे. दरम्यान, चकमकीत सातत्याने महिला नक्षली ठार होत असल्याने चळवळीतील महिलांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे.

गडचिरोली जिल्ह्य़ात १९८० च्या दशकात नक्षलवादी चळवळीचा जन्म झाला. लगतच्या आंध्रप्रदेशातून नक्षलवादी मोठय़ा संख्येत गडचिरोलीच्या जंगलात दाखल झाले. त्यानंतर ही चळवळ अधिक प्रभावशाली होत गेली. सुरूंग स्फोट, चकमक, गोळीबार, हत्यासत्र जाळपोळ यात पोलिसांसह असंख्य सामान्य आदिवासींचा बळी गेला. शासनाच्या कोटय़वधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. दरम्यान, नक्षल चळवळीला आता अखेरची घरघर लागली आहे. त्याला कारण मागील नऊ महिन्यांत गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वात अनेक चकमकीत नक्षल्यांवर वरचढ ठरत पाच महिला व दोन पुष नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळविले आहे.

अगदी सुरुवातीला जानेवारी महिन्यात बोटेझरी-वडगांवच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी कसनसूर उपकमांडर ज्योती गावडे हिला ठार केले. त्यामुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले. त्यानंतर जंगलात असंख्य छोटय़ा मोठय़ा चकमकी झाल्या. त्यातही पोलिसांना नक्षल साहित्य व शस्त्र व दारूगोळा जप्त करण्यात यश आले. ११ जुलै रोजी मुंगनेर-सोनेगांव जंगलात झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. तर काल शुक्रवारी भेंडीवरारच्या जंगलात झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. २५ ऑगस्टला रोपीच्या जंगलात नक्षल-पोलिस चकमकीत पुरूष नक्षलवादी तर २५ जुलै रोजी कवठारामच्या जंगलात झालेल्या चकमकीत मंगरू उर्फ रामा चिन्ना पोटतेरी हा नक्षलवादी ठार झाला. नऊ महिन्यात सात नक्षलवाद्यांना चकमकीत ठार करून पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे यात पाच महिला नक्षलवादी आहेत. आता नक्षल चळवळीतील महिलांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याने नक्षलवाद्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

सध्या नक्षल चळवळीकडे स्थानिक तरुण व महिलांनी पाठ फिरवली आहे. शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला सकारात्मक यश मिळत असल्यानेही नक्षली नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे. आता महिलांची भरती करायची तरी कशी असा पेच चळवळीतील नेत्यांना पडला आहे.

नर्मदाक्का

नक्षल चळवळीतील सर्वाधिक जहाल नक्षलवादी नेता नर्मदाक्का हिचे गडचिरोलीतील जंगलात वर्चस्व आहे. नक्षली चळवळीची सूत्रे नर्मदाक्का या महिला कमांडरच्या हाती आहेत. अशा स्थितीत पोलिसही केवळ महिलांनाच चकमकीत टिपत असल्याने नक्षल कमांडर नर्मदाक्का हिला धक्का बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमकी होत असतांनाच नक्षलवाद्यांचे भूसुरुंग एका पाठोपाठ एक अयशस्वी होत आहेत. ३ मे रोजी भामरागड-हेमलकसा मार्गावर झालेल्या भूसुरुंग स्फोटात सुरेश लिंगा तेलामी हा पोलिस शिपाई ठार झाला होता. तर १९ जवान जखमी झाले होते. त्यानंतर चकमकी झाल्या. परंतु जवान जखमी झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांची ही कामगिरी लक्षनीय ठरली आहे.