महापुरानंतर महागाई

भाज्या, दूध, चिकनची भाववाढ : अतिवृष्टीमुळे आवक घटली; इंधन दरवाढीचाही परिणाम

महापुरामुळे चार दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला मुंबई-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग सोमवारी खुला झाला.

भाज्या, दूध, चिकनची भाववाढ : अतिवृष्टीमुळे आवक घटली; इंधन दरवाढीचाही परिणाम

मुंबई/ ठाणे/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद : करोना टाळेबंदीमुळे अडचणीत आलेला कुक्कुटपालन व्यवसाय, कोंबडीचे खाद्य महागल्याने उत्पादन खर्चात आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यांच्या एकत्रित परिणामामुळे चिकनचे दर भडकले आहेत, तर कोल्हापूरला बसलेल्या महापुराच्या तडाख्यामुळे दूधपुरवठा विस्कळीत होऊन दरवाढ झाली आहे. अतिवृष्टीचा फटका बसल्याने भाज्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आदी शहरांमध्ये चिकनच्या दरात २० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. अंडय़ांच्या दरातही वृद्धी झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी तसेच महापुरामुळे भाजीमळ्यांची नासाडी झाली आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या पुरवठय़ावर झाला असून आवक मोठय़ा प्रमाणावर घटली आहे. आवक घटल्याने त्यांचे भाव वधारण्याची भीती आहे.

पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्य़ातून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात होणाऱ्या गोकुळ आणि वारणा दुधाच्या पुरवठय़ात ७० टक्के घट झाली आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्य़ांत दुधाचा तुटवडा जाणवू लागला असून त्यातूनच काही ठिकाणी कृत्रिम दरवाढ झाल्याचे चित्र आहे.

मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये पुणे, नाशिक आणि रायगड भागातून कोंबडय़ांचा पुरवठा होता. ठाणे जिल्ह्य़ातील वाडा भागातूनही कोंबडय़ांचा पुरवठा होतो. गेल्या काही महिन्यांपासून कोंबडय़ांचे खाद्य महागले आहे. सोयाबीन, मका आणि तेल यापासून कोंबडय़ांचे खाद्य तयार करण्यात येते. मका २२ रुपये प्रतिकिलो, सोयाबीन ८५ रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. याआधी मका १४ रुपये प्रतिकिलो आणि सोयाबीन ५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते. मका आणि सोयाबीनप्रमाणेच तेलाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांत झालेल्या इंधन दरवाढीमुळे कोंबडी वाहतूक खर्चातही मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात कोसळलेला मुसळधार पाऊस आणि महापुरामुळेही कोंबडय़ांची आवक काही प्रमाणात घटली आहे. आवक घटल्याने दरवाढ झाल्याची माहिती कुक्कुटपालन व्यावसायिक वासुदेव भांबुरे यांनी दिली.

ऐन आषाढात चिकनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. त्यामुळे दरात काही ठिकाणी प्रति किलोमागे २० ते ३० रुपयांनी, तर काही ठिकाणी ४० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात चिकनचे प्रतिकिलो दर २४० ते २५० रुपये आहेत. कोंबडय़ांच्या खाद्यपदार्थाच्या दरात वाढ झाल्यामुळे तसेच अनेक कुक्कुटपालन केंद्रे बंद पडल्यामुळे काही ठिकाणी चिकनचा दर २४० रुपये किलोपर्यंत गेला आहे. महिनाभरापूर्वी हा दर ११५ ते १२० रुपये होता.

कोंबडय़ांच्या खाद्यान्नाचे दर गेल्या सहा महिन्यांत दुप्पट झाले. फेब्रुवारीमध्ये खाद्यान्नाचा दर २६ रुपये प्रतिकिलो होता तो ४७ रुपये झाला आहे. सोयाबीनपासून तेल काढल्यानंतर उरणाऱ्या पेंडीचा दर ३१ हजार रुपये टनांवरून ८७ हजार रुपये टन एवढा झाला आहे. परिणामी कोंबडय़ांना खाद्यान्न देणे परवडत नसल्याने १० हजारांहून अधिक कुक्कुटपालन केंद्रे बंद झाल्याची माहिती कुक्कुटपालन संघटनेचे संचालक संजय नळगीरकर यांनी दिली.

करोना टाळेबंदीमुळे राज्यभरातील हॉटेल्स बंद होती. परिणामी, चिकनची मागणी कमी झाल्याने ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यावसायिकांनी पक्षी संगोपन थांबविले होते. साधारणपणे एका पक्ष्याची वाढ होण्यास ४० ते ५० दिवसांचा कालावधी लागतो. आता आषाढ महिना सुरू झाल्यानंतर चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे; परंतु त्या तुलनेत आवक मात्र कमी आहे, अशी माहिती पुणे जिल्हा ब्रॉयलर संघटनेचे रुपेश परदेशी यांनी दिली.

पुणे जिल्ह्य़ातील पुरंदर, हवेली, शिरूर तसेच खेड भागातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसाय करतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत चिकन कंपन्यांना कोंबडय़ांची विक्री केली जाते.

मुंबई, ठाण्याची दुधाची गरज

कोल्हापूर जिल्ह्य़ातून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात गोकुळ आणि वारणा दुधाचा पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये गोकुळ दूध सात लाख लिटर, तर वारणा दूध तीन लाख लिटर इतके असते. त्यापैकी ठाणे शहराला एक लाख लिटर गोकूळ आणि ५० हजार लिटर वारणा दुधाचा पुरवठा करण्यात येतो. उर्वरित दुधाचा मुंबई आणि रायगड भागांत पुरवठा होतो. कोल्हापूरमधून दुधाचे टँकर वाशीमध्ये येतात आणि तेथे दूध पिशव्या तयार करून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात पुरवठा होतो.

नागपुरातही मोठी दरवाढ

नागपूर : इंधनाची दरवाढ, तसेच कोंबडय़ांच्या खाद्यपदार्थाच्या दरवाढीमुळे नागपुरातही चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नागपूर शहरात कडकनाथ  ८०० रुपये, गावरान ६००, क्रॉकरेल २६०, ब्रॉयलर चिकन १९०, तर हैद्राबादी चिकन ३०० रुपये प्रति किलोवर गेले आहे. मागणीच्या तुलनेत चिकन मुबलक आहे. तरीही गेल्या दोन महिन्यात शंभर रुपयांच्या जवळपास दरवाढ झाली आहे. सध्या ब्रॉयलर अंडी ६० रुपये डझन, गावरान अंडी २४० रुपये डझन तर कडकनाथ कोंबडय़ांची अंडी ४८० रुपये डझन आहेत.

गेल्या १५ दिवसांत अतिवृष्टीमुळे भाज्यांची आवक घटली आहे. पूर्वी ६०० गाडय़ा येत होत्या, आता ४००- ४५० येत आहेत. पूरस्थितीमुळे येत्या आठ ते दहा दिवसात आवक आणखी घटून दरवाढीची शक्यता आहे.

शंकर पिंगळे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई

राज्यात २० हजारांहून अधिक कुक्कुटपालन केंद्रे आहेत. त्यातील १० हजारच सुरू आहेत. कुक्कुट उत्पादन निम्म्यावर आल्याने जिवंत कोंबडीचे दर प्रतिकिलो ९६ रुपयांपर्यंत वाढले आहेत.

संजय नळगीरकर, संचालक, कुक्कुटपालन संघटना

पशुखाद्याचे दर वाढल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांनी कोंबडय़ा पालनाचे प्रमाण कमी केले आहे. सध्या मागणी वाढली आहे, मात्र पुरवठा कमी आहे. त्यामुळे चिकनचे दर वधारले आहेत.

डॉ. प्रसन्न पेडगांवकर, महाव्यवस्थापक, वेंकटेश्वरा हॅचरीज

कोल्हापुरातील पूरस्थितीमुळे वाशीला येणारे दुधाचे टँकर कमी झाले आहेत. परिणामी, मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये होणाऱ्या दुधाच्या पुरवठय़ात ७० टक्के कपात झाली आहे. पांडुरंग चोडणेकर

भाज्या कडाडण्याची शक्यता!

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे भाज्यांचे मळे जवळजवळ उद्ध्वस्त झाल्याने मुंबईला होणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी, फळभाज्यांच्या दरांमध्ये किलोमागे १० ते १५ रुपये वाढ झाली आहे. येत्या काही दिवासांत भाज्यांचा मोठा तुटवडा निर्माण होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

भाज्यांचे घाऊक दर (रुपयांत)

                     पूर्वीचे   सध्याचे 

कोथिंबीर जुडी    १०     ३०

मेथी, शेपू          १०     २०

भेंडी, गवार, वाल ४०     ६०

* दुधी, कोबी, फ्लॉवरच्याही दरात दहा रुपयांची वाढ.

पुरवठय़ावर परिणाम

पश्चिम महाराष्ट्रासह, कोकणपट्टीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळेही कोंबडय़ांची आणि दुधाची आवक घटली आहे. महापूर आलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ातून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात होणाऱ्या गोकुळ आणि वारणा दुधाच्या पुरवठय़ात ७० टक्के कपात झाली आहे. यामुळे या भागांमध्ये दुधाचा तुटवडा जाणवत आहे. त्यातूनच काही ठिकाणी विक्रेत्यांनी कृत्रिम दरवाढ केल्याचे चित्र आहे.

दरवाढ कशामुळे?

४० ते ४५ दिवसांत तयार होणाऱ्या एक किलो कोंबडीसाठी ७० ते ७५ रुपये इतका खर्च येत होता; परंतु खाद्य महागल्याने आता ९० ते ९५ रुपये इतका खर्च येत आहे. कुक्कुटपालन व्यावसायिक ८० ते ९० रुपये प्रति किलो दराने, तर किरकोळ विक्रेते १२० रुपये किलो दराने कोंबडय़ांची विक्री करीत होते. आता कुक्कुटपालन व्यावसायिक १३० ते १४० रुपये प्रति किलो दराने, तर किरकोळ विक्रेते १६० ते १८० रुपये किलो दराने कोंबडय़ांची विक्री करीत आहेत.

मुंबई-बेंगळूरु मार्गावर अत्यावश्यक वाहतूक सुरू : महापुरामुळे चार दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला मुंबई-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग सोमवारी खुला झाला. सध्या या मार्गावरून अत्यावश्यक वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे. प्रामुख्याने दूध, पाणी, प्राणवायू, इंधन, अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडण्यात येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Flood in maharashtra casues rising in prices of vegetables milk and chicken zws

ताज्या बातम्या