PHOTOS: तुळजाभवानी मंदिराला फुलांची नेत्रदीपक सजावट

सोलापूरच्या काठ्यांचे तुळजापुरात भक्तिमय वातावरणात आगमन

‘आई राजा उदो-उदो, सदानंदिचा उदो-उदो’चा जयघोष करीत आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातून दाखल झालेल्या लाखो भाविकांनी तुळजाभवानीपुढे नतमस्तक होवून मनोभावे दर्शन घेतले.

‘आई राजा उदो-उदो, सदानंदीचा उदो-उदो’चा जयघोष करीत आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातून दाखल झालेल्या लाखो भाविकांनी तुळजाभवानीपुढे नतमस्तक होवून मनोभावे दर्शन घेतले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंदिर संस्थानने मंदिराला फुलांनी नेत्रदीपक सजावट केली होती. दुपारी सोलापूरच्या मानाच्या काठ्या तुळजापुरात दाखल झाल्यानंतर लाखो भाविकांनी तुळजाभवानीसह काठ्यांचे दर्शन घेण्याचा दुग्धशर्करा योग साधला.

सकाळी अकरा वाजता घाटशीळेसमोर सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या काठ्या तुळजापूरात दाखल झाल्या. नगराध्यक्ष बापूसाहेब कने यांनी सपत्नीक काठ्यांचे स्वागत करून दर्शन घेतले. बुधवारी काठ्यांचा सिंदफळ येथे मुक्काम पार पडल्यानंतर सकाळी या काठ्या पारंपारिक पध्दतीने घाटशीळ मार्गे शहरात आल्या. याच काठ्यांसोबत देवीचा छबीना पार पडला. दरम्यान पुणे येथील फुलांचे व्यापारी आर. आर. खिरात यांनी तुळजाभवानी देवीसह मंदिराला फुलांची सजावट करून कोजागिरीस साजेल, अशी सेवा केली. संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी अत्यंत देखणा सजविला होता. विविध जातीची सातशे ते एक हजार किलो १५ जातींची फुले यासाठी वापरण्यात आली होती.

बुधवारी देवीची मूर्ती मुख्य सिंहासनावर बसविण्यात आली. तुळजाभवानी भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर कदम, अतूल मलबा, विकास मलबा, शशिकांत मलबा, सचिन पाटील, सचिन कदम यांच्यासह इतर पुजारी बांधवांनी देवीची मूर्ती नगरच्या पलंगावरुन मुख्य सिंहासनावर आणली. त्यानंतर देवीची मूर्ती सुरक्षित करुन धार्मिक विधीला सुरुवात झाली. देवीस दही-दुधाचे अभिषेक घालण्यात आले. बुधवारी कोजागिरीला अडीच लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Flower decoration on tuljabhavani temple

ताज्या बातम्या