थंडीचा कडाका असतानाही सोमवारी पहाटे दाट धुके पसरल्याने हवेत तीव्र गारठा निर्माण झाला होता. शाळू फुलोर्यात, हरभर्यामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आणि द्राक्ष हंगाम काढणीच्या अवस्थेत असल्याने दवासह पडलेले धुके नुकसानकारक असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजलेपासून धुके पडत होते. हे धुके जाळीदार असल्याने येत्या काही दिवसांत पावसाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
धुक्यामुळे दव बिंदू साचत असल्याने फुलोर्यात असलेला शाळू काळे पडण्याचा आणि फुलोरा झडण्याचा धोका आहे. शाळू कणसाला केवळ एकच फुलकळी येत असल्याने धुक्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता असून हरभरा घाटे भरण्याच्या स्थितीत असलेल्या पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
द्राक्ष हंगाम आता सुरू झाला असून, काही बागांतील घड पक्वतेच्या स्थितीत पोहचले आहे, तर काही बागांतील फळकाढणीही सुरू झाली आहे. दोन वर्षांत करोनामुळे बाजारपेठेचा अंदाजच शेतकर्यांना आला नव्हता. यामुळे व्यापारी मागेल त्या दराने द्राक्षे देण्यात आली. यंदा करोना संकट नसल्याने द्राक्षाला मागणीही चांगली असली तरी अद्याप अपेक्षित साखर भरणी झालेली नाही. किमान १८ ते २२ पर्यंत ब्रियस असणे आवश्यक असताना यंदा चार महिन्यांचा कालावधी झाला तरी मण्यातील साखरेचे प्रमाण १६ ते १८ ब्रियसपर्यंतच तयार झाले आहे. मात्र, मालकाढणी सुरू झाली असून, अशातच दाट दवबिंदूयुक्त धुके पडल्याने तयार मालाची प्रतवारी खराब होण्याचा धोका असल्याचे द्राक्ष बागायतदार प्रमोद पाटील यांनी सांगितले.