रवींद्र केसकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वसामान्यांना सहज उमगावे यासाठी संत ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये भाषांतरित केली आणि विश्वकल्याणाचे पसायदान प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळू लागले. माऊलींचा हाच अमृताचा खजिना आता देश आणि जगभरातील हिंदी भाषिकांनादेखील अनुभवता येणार आहे. तुकाराम महाराजांची गाथा सर्वप्रथम हिंदी भाषेत घेऊन जाणारे सिद्धहस्त भाषांतरकार डॉ. वेदकुमार वेदालंकार यांनी आता ज्ञानेश्वरीचे हिंदी भाषांतर हाती घेतले आहे. त्यामुळे तुकाराम गाथेपाठोपाठ आता ज्ञानेश्वरीच्या भक्तीरसाचा लाभ जगभरातील हिंदी भाषिकांना मिळणार आहे.

जगद्गुरू तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा हिंदीमध्ये भाषांतरित केल्यानंतर आता माऊलींची ज्ञानेश्वरीदेखील हिंदी भाषिकांना वाचण्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. उस्मानाबाद येथील माजी प्राचार्य डॉ. वेदकुमार वेदालंकार यांनी तुकाराम महाराजांची गाथा तीन खंडात भाषांतरित करून जगभरातील हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करून दिली. आता ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायातील नऊ हजार ओव्यांचे भाषांतर करण्याचे काम वेदालंकार यांनी हाती घेतले आहे. विशेष म्हणजे या लॉकडाउनच्या कालावधीत तीन अध्यायांचे भाषांतर पूर्णही झाले आहे. या तीन अध्यायातील सुमारे सातशेहून अधिक ओव्या माऊलींच्या कृपाशीर्वादाने पूर्ण झाल्या असल्याचे डॉ. वेदालंकार यांनी सांगितले.

संतसाहित्य जगभरातील अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. संतांनी मानवतेची शिकवण अगदी साध्या सोप्या शब्दांत समाजासमोर मांडली. केवळ भाषिक अडसर असल्याने आजही हे मानवी मूल्यांची शिकवण देणारे तत्वज्ञान अनेकांपासून दूर आहे. त्यामुळेच उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. वेदकुमार वेदालंकार यांनी सुरू केलेले हे काम लक्षवेधी आहे. हिंदी भाषेत तुकाराम गाथा अगदी ओघवत्या शैलीत घेऊन जाण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी चोख पार पाडले आहे. एकनाथ महाराजांच्या ६५ भारुडांचाही त्यांनी हिंदी अनुवाद केला आहे. हा भारुडसंग्रह सध्या वाचकांसाठी उपलब्ध आहे. या महत्वपूर्ण योगदानानंतर आता ज्ञानेश्वरीचा रसाळ आस्वाद वाचकांना हिंदीमधून घेता येणार आहे.

माजी प्राचार्य डॉ. वेदकुमार वेदालंकार यांनी यापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा, वारणेचा वाघ, वारणेच्या खोऱ्यात या तीन कादंबऱ्यासह वीस निवडक कथांचा हिंदी अनुवाद केला आहे. त्याचबरोबर मराठीतील संगीत नाटकांचे मानदंड मानल्या जाणाऱ्या संगीत सौभद्र, कट्यार काळजात घुसली आणि शारदा या तिन्ही संगीत नाटकांचेही हिंदी भाषांतर पूर्ण केले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी मोठ्या उमेदीने त्यांनी ज्ञानेश्वरीचे भाषांतर सुरू केले आहे. तरुणांनी आपल्या परिसरातील आशा प्रकारचा समृद्ध साहित्यिक आणि वैचारिक वारसा जगासमोर मांडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठीच उतारवयातही आपण न थकता भाषांतराचे काम सुरू ठेवले असल्याचे डॉ. वेदकुमार वेदालंकार सांगतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Following the tukaram gatha now dnyaneshwari being translatd in hindi aau
First published on: 02-07-2020 at 17:48 IST