दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : करोना निर्बंध हटविल्यानंतर लग्नसराई धुमधडाक्यात सुरू असली, तरी इंधन दरवाढीबरोबरच खाद्यतेल, बासमती तांदूळ, भाजीपाला, मजुरी यांचे दर वाढल्याने कार्यालयातील स्नेहभोजनाचे दरही २५ ते ४० टक्क्यांनी कडाडले आहेत. यामुळे आधीच अन्य खर्चामुळे मेटाकुटीला आलेले यजमान या दरवाढीमुळे आणखी कात्रीत सापडले आहेत.

एप्रिल ते जूनचा पहिला पंधरवडा हा लग्नसराईचा हंगाम समजला जातो. गेले दोन वर्षे करोनाचे सावटाचे असल्याने लग्नासारखा महत्त्वाचा विधी हा या निर्बंधामध्ये करण्याऐवजी तो अनेकांनी पुढे ढकलणे पसंत केले. यंदा करोनाचे सावट काहीसे सैलावत निर्बंधमुक्त जीवन सुरू झाल्यावर गेली दोन वर्षे रखडलेली तसेच यंदा ठरलेली अशा सर्वच लग्नकार्याची धांदल उडाली आहे. मात्र या लग्नसराईला महागाईने गाठले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून गॅस सिलिंडर, डिझेलसह इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. इंधनातील या दरवाढीमुळे जवळपास सर्वच किराणा सामानाचे दर महागले आहेत. दुसरीकडे जागतिक बाजारपेठेत भडकलेल्या खाद्यतेलाने आपल्याकडेही महागाईचा कळस गाठला आहे.

सामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी असलेल्या मंगल कार्यालयात साध्या शिरा-भाताचे जेवण असेल तर पूर्वी ताटाला ८० रुपये द्यावे लागत होते. आता याच पदार्थाच्या जेवणाचे ताट १०० ते १२० रुपयांवर पोहोचले आहे. तर साधा भात, मसाले भात, वांगी-बटाटा भाजी, आमटी, कोशिंबीरसह एखादे पक्वान्न या ताटाचे दर दीडशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पुरीसह बासुंदी, श्रीखंड, अंगूर मलई अशा विशिष्ट पदार्थाची मागणी असेल तर त्यासाठी आता ३०० रुपये प्रतिताट मोजावे लागत आहेत. दोन महिन्यांपूर्वी या पदार्थाचे ताट २२५ ते २५० रुपयांपर्यंत मिळत होते.  याशिवाय वऱ्हाडी मंडळींना भोजनानंतर पान, आइस्क्रीम द्यायचे तर त्याचेही दर वधारले आहेत. एकूणच या सर्वच पातळीवर ही दरवाढ झालेली आहे.

किराणा माल, खाद्यतेल, इंधन दरवाढ याचबरोबर मजुरीच्या दरातही वाढ झाल्याने यंदा जेवणावळीतील ताटांचे दर वाढले आहेत. लग्न कसे झाले हे विचारणारा प्रामुख्याने जेवणाचा काय बेत होता यासोबतच दराचीही चर्चा करतो.

ओंकार शुक्ल, रंगशारदा हॉल, मिरज.

ताटासाठी सहाशे..

सर्व सुखसुविधांनी युक्त अशा क्लब, रिसॉर्टवरील भोजनावळीचे दर तर आता मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मलई कोप्ता, कटलेट, काजू, बदामयुक्त बासमती तांदळाचा मसाले भात, रसमलई, काजूपनीर, गोबी मंचुरियन, गोबी सांबर यांची मागणी असलेल्या ताटासाठी आता सहाशे रुपये मोजावे लागत आहे.

वाढत्या उपस्थितीचाही ताण

करोनामुळे पडलेल्या खंडानंतर  आता होऊ घातलेली लग्ने म्हणजे सर्वासाठीची स्नेहसंमेलनेच असतात. यामुळे पूर्वीच्या तुलनेत लग्नकार्यासाठी लागणारी उपस्थितीही वाढली आहे. ही वाढती वऱ्हाडी संख्या पुन्हा या महागाईत ताण वाढवत आहे.

कारण काय? दोन महिन्यांपूर्वी बावीसशे रुपयांना मिळत असलेला १५ लिटर खाद्यतेलाचा डबा सध्या २७०० ते २९५० रुपयांवर पोहोचला आहे. ८० ते १०० रुपये किलो मिळणारा बासमती तांदूळ १२० ते १४० रुपयांवर पोहोचला आहे. याचा परिणाम म्हणून कार्यालयातील भोजनावळीचे दरही वाढले आहेत.