जिल्हय़ातील अंगणवाडीतील बालकांना पुरवठा झालेली राजगिरा चिक्की माती व दगडकण मिश्रित असल्याच्या मुद्दय़ावर जिल्हा परिषद ठाम असून, महिला व बालकल्याण समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत जप्त केलेली भेसळयुक्त चिक्कीची पाकिटे विभागीय आयुक्तांकडे पाठवतानाच त्याऐवजी त्यांच्याकडून कोणतेच खाद्यपदार्थ स्वीकारू नये, असा निर्णय घेण्यात आला. या खरेदीचे अधिकार राज्याच्या स्तरावर न ठेवता जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदेकडूनच ही खरेदी करावी, अशी मागणी करणारा ठरावही या सभेत करण्यात आला.
समितीच्या सभापती नंदा वारे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, सदस्या आशा मुरकुटे, कांचन मांढरे, योगिता राजळे, निर्मला गुंजाळ, सकुबाई केदार, सुमनताई देवरे आदी या वेळी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना समितीच्या सूत्रांनी सांगितले, की ही भेसळयुक्त चिक्की मुलांना खाण्यास देऊ नये, यावर जिल्हा परिषदेत एकमत आहे. त्यामुळेच अंगणवाडीतील मुलांना ही चिक्की देणे मागेच बंद केले आहे. मात्र चिक्कीची जप्त केलेली पाकिटे विभागीय कार्यालयाला परत करण्यात येणार आहेत. याशिवाय त्यांच्याकडून दुसरे कोणतेच खाद्यपदार्थ यापुढे स्वीकारू नयेत, असा निर्णय या सभेत घेण्यात आला. प्रकल्प स्तरावर करण्यात आलेला हा पुरवठा रद्द करण्याची मागणी समितीने सभेतच केली असून, यापुढे जिल्हा स्तरावरच जिल्हा परिषदेला खरेदीचा अधिकार द्यावा, असा ठरावही सभेत झाला.
जिल्हय़ातील अंगणवाडीतील बालकांना पुरवठा झालेली राजगिरा चिक्की माती व दगडकण मिश्रित असताना, याच चिक्कीच्या दोन नमुन्यांचा सरकारी प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल मात्र चक्क ‘खाण्यासाठी योग्य’ असा आला आहे. त्यामुळे आश्चर्य आणि संशयही व्यक्त होत असून, ही चिक्की भेसळयुक्त असल्याच्या मुद्दय़ावर ठाम राहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजूषा गुंड व उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी या चिक्कीचे जिल्हय़ात वाटप होऊ दिले जाणार नाही, असे पूर्वीच जाहीर केले आहे.
राजगिरा चिक्कीचे एकूण ५ नमुने जि.प.ने तपासणीसाठी पाठवले होते. दोन नमुने सरकारी प्रयोगशाळेत व ३ नमुने मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातील सरकारी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या दोन नमुन्यांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. ही चिक्की खाण्यास योग्य असल्याचा निर्वाळा सरकारी प्रयोगशाळेने दिला आहे. खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील नमुन्यांचा अहवाल मात्र अद्याप प्राप्त झालेला नाही.