ताटे कमी आहेत म्हणून दोन विद्यार्थ्यांना एकच ताट, तांदळाच्या पोत्यांमध्ये अळ्या, भुंग्यांनी चण्याच्या पोत्यांमध्ये केलेले पीठ, कोंडवाडय़ाशी स्पर्धा करणारी निवास व्यवस्था.. हे विदारक चित्र मेळघाटातील चिखली येथील आदिवासी आश्रमशाळेत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्यासमवेत गेलेल्या पथकाला गुरुवारी सायंकाळी पहायला मिळाले.
तापाने फणफणलेल्या एका मुलीला औषधोपचार सोडा, साधी विचारपूसही न करण्याचा गंभीर प्रकारही या आकस्मिक दौऱ्यातून समोर आला. या प्रकरणी तात्काळ चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. विभागीय आयुक्तांसह प्रशासकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले पथक गुरुवारी सायंकाळी धारणी तालुक्यातील हरिसालपासून अवघ्या ६ किलोमीटरवरील चिखलीच्या आदिवासी आश्रमशाळेत पोहोचले तेव्हा त्यांना एका पाठोपाठ धक्के बसत गेले. ‘स्वच्छ भारत अभियाना’ला गुंडाळून ठेवत जागोजागी पसरलेला कचरा, शौचालयात पाण्याचा पत्ता नाही, शौचासाठी मुला-मुलींना उघडय़ावर जाण्यावाचून पर्याय नाही. अंधारकोठडीसदृश्य निवासाची खोली, निकृष्ट भोजन आणि त्याचीही कमतरता, असे अनेक प्रकार दिसून आले. या पथकाने जेव्हा गोदामातील धान्याची तपासणी केली तेव्हा, त्यांना चांगलाच धक्का बसला. खुल्या पोत्यातील तांदळात अळ्या दिसल्या. जेव्हा चण्याचे पोते उघडण्यात आले तेव्हा त्यांना भुंग्यांनी कुरतडलेले चणे आणि पीठच दिसले. मुलांना जेव्हा भोजन दिले जात होते तेव्हा दोन विद्यार्थ्यांना एकच ताट मिळत असल्याचे या पथकाला दिसले. त्यांनी विचारणा केल्यावर ताटे कमी आहेत म्हणून तसे करावे लागत असल्याचे चक्रावून टाकणारे उत्तर मिळाले. विद्यार्थ्यांवर एकाच ताटात जेवण्याची पाळी आली, त्याविषयी शाळा व्यवस्थापनाला कुठलेही सोयरेसुतक नव्हते. त्यावर कळस म्हणजे, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोळ्या अत्यंत घाणेरडय़ा अशा चादरीवर पसरवून ठेवल्याचे दिसले. डाळीचे वरण, भात, पोळी मुलांना वाढली गेली, पण रांगेत शेवटी असलेल्या दहा मुलांना पोळ्या मिळाल्याच नाहीत. भात खाऊनच त्यांना आपली भूक शमवावी लागली.
मुलींच्या निवासाच्या खोलीत अंधार, झोपण्यासाठी पायही लांब करता येणार नाहीत, अशा अरुंद फोमच्या शिट्स, एका कोपऱ्यात वस्तू ठेवण्याची जागा, आश्रमशाळेतील ही अव्यवस्था आणि अस्वच्छता पाहून विभागीय आयुक्त चांगलेच संतापले. त्यांनी मुख्याध्यापकांना जाबही विचारला, पण ते निरुत्तर होते. खोलीतच निपचित पडून असलेल्या एका मुलीकडे पथकाचे लक्ष गेले तेव्हा, तिला ताप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या मुलीला लगेच हरिसालच्या आरोग्य केंद्रात नेण्यात नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले. या दौऱ्यात आयुक्तांसमवेत आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रमेश  मवासी, उपविभागीय अधिकारी व्ही.के. राठोड, आरोग्य अधिकारी, डॉ. जावरकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर बोबडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिलिंद पाटणकर, सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे सहभागी झाले होते.
अहवाल सादर करणार – रमेश मवासी
चिखलीच्या आश्रमशाळेतील गैरव्यवस्था आणि अस्वच्छतेचा प्रकार गंभीर आहे. याविषयी अधीक्षक आणि मुख्याध्यापकांना कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले असून विभागीय आयुक्तांनी आपल्याला चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे प्रकल्प अधिकारी रमेश मवासी यांनी सांगितले.