राहाता : प्रवरा परिसरातील धानोरे गावातील शेतकरी रमेश सुखदेव दिघे यांच्या शेतात जखमी झालेल्या बिबट्यास वन विभागाने भूल देऊन जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.रमेश सुखदेव दिघे हे त्यांच्या शेतात गिनी गवत आणण्यासाठी गेले होते. बिबट्या दबकत त्यांच्याकडे येताना दिसला. ते खूप घाबरले व चारा तेथेच ठेवून धूम ठोकली. चार-पाच जणांना घेऊन ते परत आले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले, की बिबट्या धडपडत चालतो आहे. त्यांनी लांबूनच त्याचे निरीक्षण केले. त्यांना तो जखमी असल्याची खात्री पटली. त्यांनी वन्यजीव प्राणिमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. माहिती मिळताच म्हस्के लगेच घटनास्थळी पोहचले.

परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांनी अहिल्यानगरचे उपवन संरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, सहायक उपवन संरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, संगमनेरचे सहायक उपवन संरक्षक अधिकारी अमरजित पवार, राहुरीचे वनपरिक्षेत्र सुनील साळुंखे यांना माहिती दिली. राहुरीचे अधिकारी साळुंखे, वनपाल एल. पी. शेंडगे, वनरक्षक एस. आर. कोरके, एन. वाय. जाधव, एम एच. पठाण, घनदाट, झावरे, चालक ताराचंद गायकवाड घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती पाहून संगमनेरहून ‘रेस्क्यू टीम’ बोलावण्यात आली. रेस्क्यू पथकातील संतोष पारधी, अरुण साळवे, प्रवीण चव्हाण हे पोशाख परिधान करून व बेशुद्धीचे इंजेक्शन देणारी बंदूक घेऊन ट्रॅक्टरवर बसून उसाच्या शेतात घुसले. बिबट्या टप्प्यात येताच संतोष पारधी यांनी पहिल्याच ‘डार्ट’मध्ये बिबट्या बेशुद्ध केला. डार्ट मारताना सोनगावचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रदीप सोनावणे यांनी मार्गदर्शन केले. बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच प्राणिमित्र, रेस्क्यू टीम आणि राहुरी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्यास स्ट्रेचरवर टाकून उसातून बाहेर काढले.

हा बिबट्या मादी जातीचा, सहा ते सात वर्षे वयाचा आहे. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे वन विभागाला काम करण्यास अडथळा येत होता. उपस्थितांनी पथकातील तज्ज्ञ संतोष पारधी यांनी मोहीम फत्ते केल्याबद्दल व रमेश दिघे यांनी नुकसान होत असतानासुद्धा ट्रॅक्टर उसात घालू दिला, त्याबद्दल दोघांचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले.