चंद्रपुरात वन अधिकाऱ्याने बिबट्याशी एकाकी झुंज दिल्याचा एक चित्तथरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. झालं असं की, जखमी बिबट्याला मदत करण्यासाठी गेले असता अचानक बिबट्याने वन अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्यावेळी अधिकारी निशस्त्र होते. मात्र अशा परिस्थितीतही अधिकाऱ्याने धैर्य दाखवत बिबट्याशी झुंज दिली. बिबट्या वारंवार अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अधिकाऱ्याने हार न मानता अत्यंत धीटपणे बिबट्याचा सामना केला.

रस्ता ओलांडताना कारने दिलेल्या धडकेत बिबट्या जखमी झाला होता. माहिती मिळाल्यानंतर बिबट्याला वाचवण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली होती. पण वन अधिकाऱ्याला पाहून बिबट्या नियंत्रणाबाहेर गेला आणि हल्ला केला. वन अधिकाऱ्याने हातातील काठीच्या सहाय्यानेच बिबट्याला नियंत्रणात आणत हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, बिबट्या वन अधिकाऱ्याचा पाठलाग करत असून, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दिसत आहे.

बिबट्याच्या पायाला जखम झाली असून तो लंगडत असल्याचंही दिसत आहे. अनेक तासानंतर बिबट्यावर ताबा मिळवण्यात यश आलं. नंतर बिबट्यावर उपचार करण्यात आले.

जखमी बिबट्याची माहिती गावकऱ्यांनीच वनविभागाला कळवली होती. पण वन अधिकारी पोहोचण्याआधीच बिबट्या एका झुडपात जाऊन लपला होता. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लोक जखमीदेखील झाले.