नांदेड : आई, भाऊ आणि मित्राच्या शेतामध्ये असलेली सागवानाची झाडे तोडण्यासाठी परवानगी आणि झाडे तोडल्यानंतर आवश्यक परवानग्या देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर उपवनसंरक्षण कार्यालयातील वन सर्वेक्षक गणेश मज्जनवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली आहे.

तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. १० हजार रुपये लाच देण्याचे ठरल्यानंतर 5 हजार रुपये मज्जनवार यांनी पूर्वी स्वीकारले होते. उर्वरीत पाच हजारामध्ये तडजोड करण्यासाठी तक्रारदार मज्जनवार यांच्याकडे गेले असता त्यांनी वाहतूक परवाना देण्याचे काम वाढले असल्याचे कारण सांगून आणि आणखी तीन हजार रुपये लाचेची मागणी करून एकूण १३ हजार रुपये स्वीकारले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धर्मसिंग चव्हाण, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक समीर शेख यांच्या पथकाने केली..