Pune Scientist Sanjay Kadam Heart Attack Satara Hill Half Marathon: कठीण आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ दरम्यान रविवारी एका धावपटूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. संजय कदम (वय ६५) असे या मृत धावपटूचे नाव असून ते पुण्यातील सी-डॅकचे निवृत्त शास्त्रज्ञ होते. या घटनेमुळे मॅरेथॉन वर्तुळात आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या कदम यांनी २१ किलोमीटरच्या या स्पर्धेतील तब्बल १७ किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पार केले होते. मात्र, अंतिम टप्प्यात असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते अचानक जमिनीवर कोसळले.
तातडीने वैद्यकीय उपचार, पण प्रयत्न अपुरे
सातारा रनर्स फाउंडेशनच्या वैद्यकीय मंडळाचे सदस्य डॉ. प्रताप गोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम खाली कोसळताच घटनास्थळी सज्ज असलेल्या रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले. घटनास्थळी डॉ. रियाझ मुजावर यांनी त्यांना सीपीआर दिला. त्यानंतर तातडीने त्यांना साताऱ्यातील पल्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिथे डॉ. कौशिक पाटील आणि त्यांच्या पथकाने पुढील उपचार सुरू केले. तपासणीत कदम यांच्या मुख्य रक्तवाहिनीत ब्लॉकेज असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी केली. रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. या संदर्भात कुटुंबीयांना वेळोवेळी माहिती दिली जात होती. मात्र दुपारच्या सुमारास त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
‘धावणे हाच त्यांचा श्वास होता’
कदम यांच्या निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चुलत भाऊ अनिल कदम यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “संजय यांना घरात सगळे प्रेमाने ‘तानाजी’ म्हणत. वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता. वाढत्या वयामुळे आम्ही त्यांना अनेकदा लांब पल्ल्याच्या धावण्याचा वेग कमी करण्याचा सल्ला देत होतो. मात्र धावणे हा त्यांचा छंद होता आणि त्यातून त्यांना अथांग आनंद मिळायचा. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत ते सक्रिय राहिले.”
कदम यांच्या ९५ वर्षीय आजारी मातोश्री शांता कदम या व्हेंटिलेटरवर आहेत. आपल्या मोठ्या मुलाचे निधन झाल्याचे समजल्यानंतर त्यांना हा आघात सहन करणे अवघड गेले. संजय कदम यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारा हिल हाफ मॅरेथॉनबद्दल
२०१२ पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही भारतातील अत्यंत आव्हानात्मक २१.१ किलोमीटरची मॅरेथॉन मानली जाते. स्पर्धेचे संस्थापक डॉ. संदीप काटे यांनी सांगितले की, समुद्रसपाटीपासून ६५० मीटर उंचीवर असलेल्या सातारा शहरातून ही मॅरेथॉन सुरू होते, त्यानंतर कास पठाराच्या दिशेने तीव्र चढ पार करून धावपटू पुन्हा शहरात उतरतात. त्यामुळे अर्धी स्पर्धा पूर्णपणे चढाची आणि अर्धी पूर्ण उताराची असते. यंदा या स्पर्धेचे १५ वे वर्ष होते आणि देशभरातून सुमारे ८,८०० हून अधिक धावपटूंनी यात सहभाग घेतला होता.
