जतच्या माजी सभापतींची पत्नीसह हत्या

जतचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण आणि त्यांच्या पत्नी शैलजा यांची मध्यरात्री धारदार हत्याराने अज्ञाताने हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

जतचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण आणि त्यांच्या पत्नी शैलजा यांची मध्यरात्री धारदार हत्याराने अज्ञाताने हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. डफळापूरपासून पश्चिमेस कोकळे रस्त्यावरील मळ्यात असणाऱ्या बंगल्यात ही घटना घडली. ही हत्या कशासाठी झाली, याचा उलगडा अद्याप लागला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र मळ्यात कायम वस्तीला असलेला सालगडी या घटनेनंतर फरारी झाला आहे.
सुनील चव्हाण हे कोकळे मार्गावर डफळापूरपासून पश्चिमेस बंगला असून ते पत्नीसह वास्तव्यास होते. त्यांना दोन मुले असून एक मुंबईस व धाकटा सांगलीत वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत ते सांगलीत होते. त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी आले.
मंगळवारी सकाळी त्यांच्याकडे काम करणारा गडी गावातून मळ्यात आल्यानंतर बंगल्याच्या दाराला बाहेरून कुलूप असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला शंका आली. त्याने चव्हाण यांच्या नातेवाइकाशी संपर्क साधून मळ्याकडे बोलावून घेतले. कुलूप तोडून बंगल्यात गेल्यानंतर सुनील बाळासाहेब चव्हाण आणि त्यांच्या पत्नी शैलजा ही दोघेही शयनकक्षात रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले.
दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राचे घाव आढळून आले असून जत पोलिसांनी श्वानपथकामार्फत हल्लेखोरांचा तपास लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तपास लागला नाही. मृतदेहाजवळच सोन्याच्या दोन अंगठय़ा, पत्नीच्या अंगावरील दागिने आढळून आले असल्याने सदरची हत्या ही दरोडय़ाच्या उद्देशाने झालेली नसावी असा निष्कर्ष तपास अधिकाऱ्यांनी काढला असून अन्य कारणांचा शोध घेण्यात येत आहे. घरात दीड ते दोन लाखांची रोकडही तशीच असल्याचे सांगण्यात आले.
रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान हे हत्याकांड घडले असावे असा अंदाज मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोरांनी खून केल्यानंतर बंगल्याला बाहेरून कुलूप लावले असल्याने सदरची घटना सकाळी गडी आल्यानंतरच लक्षात आली.
दरम्यान, वस्तीवर एक गडी रात्री मुक्कामास असायचा. सदरची घटना घडल्यापासून तो गायब झाला असून तो गायब होण्यामागे कोणते कारण असावे याचा शोध अद्याप लागलेला नाही. सदरचा गडी कर्नाटकातील होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक कर्नाटकात रवाना करण्यात आले आहे.
या हत्याकांडाचे गूढ उकलण्यासाठी पोलीस यंत्रणा गतिमान करण्यात आली असून राजकीय नेत्याच्या हत्येमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पंधरा दिवसांपासून बसाप्पावाडी तलावातून गावासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता पाइपलाइन टाकण्यास तीव्र विरोध झाला होता. त्या वेळी पोलीस बंदोबस्तात हे काम हाती घेण्यात आले होते. खुनामागे हे राजकीय कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. सालगडी फरार झाला असल्याने या हत्याकांडाचे गूढ वाढले आहे. पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.
 पती-पत्नीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी मळ्यात अंत्यविधी करण्यात आले. या वेळी माजी आ. उमाजी सनमडीकर, विक्रमसिंह सावंत, बाजारसमितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former chairperson killed with his wife of jat

ताज्या बातम्या