गेल्या काही काळात वेदान्त फॉक्सकॉनसह काही प्रकल्प परराज्यात गेल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यावरून पुन्हा सवाल उपस्थित केला आहे.
अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारने वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पाला दिलेल्या सवलतींची तुलना करत अप्रत्यक्ष केंद्र सरकारवर निशाणा साधला. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राने अनेक भरीव सवलती फॉक्सकॉन प्रकल्पाला दिल्या होत्या. तरीही ती कंपनी गुजरातमध्ये का गेली? असा सवाल चव्हाण यांनी विचारला. अनेक सवलती देऊनही ही कंपनी गुजरातला गेली. म्हणजेच कोणती तरी अदृश्य शक्ती काम करत आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल, असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं. ते ‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्राबाबत आपलं व्हिजन मांडताना अशोक चव्हाण म्हणाले, “वेदान्त फॉक्सकॉनचा विषय मी मुद्दाम याठिकाणी उपस्थित करतोय. हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर का गेला? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राने ४० हजार कोटींची सबसिडी देण्याचं मान्य केलं होतं. तर गुजरातने केवळ २८ हजार कोटींची सबसिडी देण्याचं मान्य केलं. म्हणजेच आपली सबसिडी जास्त होती. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे आपण ११०० एकर जमीन देण्याचं मान्य केलं. त्यापैकी ४०० एकर जमीन विनामूल्य द्यायचं ठरलं होतं. उर्वरित ७०० एकर जमीन बाजारभावाच्या तुलनेत ७५ टक्के दराने देण्याचं ठरलं होतं.दुसरीकडे, गुजरातने ७५ टक्के दराने केवळ २०० एकर जमीन देण्याचं मान्य केलं.”
“याचाच अर्थात वाटाघाटीत महाराष्ट्र सगळ्यात पुढे राहिला. गुंतवणुकीचं आकर्षक ठिकाण म्हणून महाराष्ट्राने सगळ्या सवलती देऊ केल्या. पण फॉक्सकॉन प्रकल्प आपल्याकडे न येता गुजरातमध्ये गेला. त्यामुळे कुठली तरी अदृश्य शक्ती काम करतीय, असं म्हणण्यास वाव आहे. आमचं सगळंचं गुजरातला चाललंय,” अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.