जनतेचा पाठिंबा आम्हालाच असल्याचा दावा
अमरावती : निवडणूक आयोग पक्षाला चिन्ह वाटप करू शकतो, परंतु पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार आयोगाला नाही. शिवसेना हे नाव माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी दिले आहे, ते कोणाला चोरी करू देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोमवारी अमरावतीत दिला.अमरावती येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, शिवसेना चोरण्याचा प्रयत्न झाला. पण लोक आमच्या शिवसेनेसोबत आहेत. आमदारांची संख्या वगैरे ठीक आहे. निवडणूक आयोग चिन्ह बदलू शकतो, पण पक्षाला नाव देणे, हे आयोगाच्या कक्षेत येत नाही. पक्षाचे नाव बदलण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत.
मला कधीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार असे वचन मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. हेच मी गृहमंत्री अमित शहा यांना सांगितले होते. मी स्वत:च मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हतो. मी पंतप्रधान झालो, तरी काय फरक पडणार आहे? माझ्यासमोर प्रश्न आहे, तो देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचा. देशात आणीबाणीनंतर विरोधी पक्षांना बोलण्याची संधी तरी दिली गेली होती. जनता पक्ष आणि अनेक समविचारी नेते मैदानात उतरले होते. आता तीदेखील मुभा राहिलेली नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.
देशात विरोधी पक्षांची एकजूट सुरू आहे. खरे तर मी त्यांना विरोधी पक्ष मानण्यास तयार नाही. ही देशप्रेमी लोकांची एकता आहे. त्याला सरकार घाबरलेले आहे. पूर्वी सरकार मतपेटीतून तयार व्हायचे आता खोक्यातून व्हायला लागले आहे. कुणीही दमदाटी करून पक्ष चोरण्याचा प्रयत्न करतो. हा पायंडा आता पडला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जनतेला ‘राईट टू रिकॉल’चा अधिकार मिळाला पाहिजे, असे माझे मत आहे असल्याचे ठाकरे म्हणाले.
अजित पवारांनी सरकारला नपुंसक, असे संबोधले होते, आता ते सरकारमध्ये का गेले, असे विचारले असता उद्धव ठाकरे यांनी कदाचित ताकद वाढवायला गेले असतील, असा टोला ठाकरेंनी लगावला.
रात्री हुडी घालून गुप्त बैठका कुणी घेतल्या?
एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी रुग्णालयात असताना रात्री हुडी घालून गुप्त बैठका कुणी घेतल्या? मला हलताही येत नव्हते हे खरे आहे, पण तेव्हा यांच्या हालचाली चालल्या होत्या, रात्रीच्या गाठीभेटी चालल्या होत्या. पूजाअर्चा चालल्या होत्या, त्याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक’
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही या अवस्थेतून ते जात आहेत. ते नागपूरला लागलेला कलंक आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदूत्वाशी गद्दारी केल्याचा आरोप भाजपने केला. मग २०१४ मध्ये भाजपने युती का तोडली, २०१९ मध्ये विश्वासघात का केला. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना बरोबर घेणारा भाजप हाच खऱ्या अर्थाने हिंदूत्वविरोधी आहे. नागपुरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयाचा संदर्भ देऊन ठाकरे यांनी ‘मन की बात’ उर्दूतून मदरशात ऐकवण्यास सांगणाऱ्या भाजपचे हिंदूत्व संघाला मान्य आहे का, असा सवाल केला. वर्षांनुवर्ष पक्षासाठी कष्ट करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची दया येते, असे सांगत ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हे कार्यकर्ते लढले त्याच पक्षाच्या नेत्यांना भाजप सोबत घेत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उपऱ्यांसाठी किती काळ सतरंज्या उचलायच्या, असा सवालही ठाकरेंनी केला.
ठाकरे-राणांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष
उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान आमदार रवी राणा व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी गर्ल्स हायस्कूल चौकात हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले होते, पण पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नजीकच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण केले. ठाकरेंचा निषेध करण्यासाठी त्यांना साडी-चोळीचा आहेर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी रोखले. राणांच्या कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे संतप्त शिवसैनिकांनी रवी राणांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखले. संत ज्ञानेश्वर सभागृहातील संवाद सभा आटोपल्यानंतर शिवसैनिकांनी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
