लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यभरात महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरु आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती आहे. पार्थ पवार यांच्या सुरक्षेवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. “घरात काम करणाऱ्यांना पण वाय प्लस, झेड प्लस दर्जाची सुरक्षा देत आहेत”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“आता सुरतमध्ये एक जादू झाली आणि भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. अशा प्रकारची जादू आता होऊ लागली तर सर्वसामान्य लोक काय शिल्लख राहणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हेच एक यावर उत्तर आहे. राज्यात महाविकास आघाडीचे ४८ खासदार निवडून येतील, असे वाटत आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : मतदानाआधीच सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा, ‘या’ घोटाळ्यातून मिळाली क्लीन चिट!

उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला

पार्थ पवार यांच्या वाय प्लस दर्जाची सुरक्षेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला कळले की, रॉकेट, रणगाडे वैगेरे वैगेरे…काय काय त्यांना देत आहेत. आता घरात काम करणाऱ्यांना पण वाय प्लस, झेड प्लस दर्जाची सुरक्षा देत आहेत. मात्र, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार होत आहे. पण इकडे गद्दारांची सुरक्षा केली जात आहे”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

अशोक चव्हाण यांच्यावर टीका

उद्धव ठाकरे यांची आज नांदेडमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. “अशोक चव्हाण भाजपात गेल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.