scorecardresearch

सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजुने लागणार?; अशोक चव्हाणांचं सूचक विधान, न्यायाधीशांच्या मतांचा हवाला देत म्हणाले…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

ashok chavan and eknath shinde uddhav thackeray
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मागील आठ ते नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी संपली आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. न्यायाधीशांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना शिंदे गटाच्या वकिलांना उत्तरंही देता आली नाहीत.

एवढंच नव्हे तर न्यायालयाने महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. न्यायालयातील या घडामोडींनंतर निकाल नेमका कुणाच्या बाजुने लागणार? याबाबत तर्क -वितर्क लावले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्याच बाजुने लागेल, असा अंदाज अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपानंतर राज्य सरकारचा तोडगा; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

अशी एकंदरीत स्थिती असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महाविकास आघाडी अर्थात उद्धव ठाकरे यांच्याच बाजुने लागेल, असं सूचक विधान अशोक चव्हाण यांनी केलं. यासाठी त्यांनी न्यायाधीशांच्या युक्तिवादाचा हवाला दिला. नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं.

हेही वाचा- “शिवसेना भवनावर चाल करून येणाऱ्या गद्दारांना…”, ही धमकी समजा म्हणत संजय राऊतांचं मोठं विधान!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजुने लागेल? असं विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले,”मला अपेक्षा आहे की, ज्या पद्धतीने सरन्यायाधीशांनी न्यायालयात त्यांची मतं व्यक्त केली आहेत. त्यावरून हा निकाल महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजुने लागेल, अशी अपेक्षा आहे. पण बघुयात नेमका निकाल कुणाच्या बाजुने लागतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 13:59 IST