scorecardresearch

नाटकात काम केलं तिथेही नेताच बनवलं आणि नरकात पाठवलं-फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला

नाटकात काम केलं तिथेही नेताच बनवलं आणि नरकात पाठवलं-फडणवीस
संग्रहीत

मी नाटकात केलं आहे तिथे सातपैकी दोनवेळा मला नेताच बनवलं होतं आणि नरकात पाठवलं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पिंपरीत पार पडलेल्या मोरया युथ फेस्टिव्हलमध्ये त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यापैकी नाटकासंदर्भातला प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा फडणवीस यांनी दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला.

“या नाटकाचा कथाभाग असा होता की सगळेजण मरतात आणि स्वर्गाच्या दारी जातात. तिथे यमदूत असतो तो ठरवत असतो कुणी स्वर्गात जायचं आणि कुणाला नरकात पाठवयाचं? मला तेव्हा नेत्याचा रोल दिला होता आणि मला नरकात पाठवलं गेलं.” असं जेव्हा फडणवीस म्हणाले तेव्हा एकच हशा पिकला. सचिन पटवर्धन आणि राहुल सोलापूरकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

वाद-विवाद स्पर्धेच्याही आठवणी

याच मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी वाद-विवाद स्पर्धेच्याही आठवणी सांगितल्या. “महाविद्यालयात पहिल्या वर्षाला असताना एक वाद-विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत मी सुरुवातीला भाग घेतला नव्हता. मात्र माझ्या एका मित्राने आणि त्याच्या मैत्रिणीने भाग घेतला होता. वाद-विवाद स्पर्धेत भाग घेणारी मैत्रीण आजारी पडली म्हणून मित्राने मला विचारलं. मी त्याला म्हटलं की मला अशा स्पर्धेची सवय नाही. तो म्हणाला काही होत नाही तू थोडी तयारी कर आपण भाग घेऊ. त्याप्रमाणे मी तयारी केली. त्या स्पर्धेत एकूण पाच ते सहा मिनिटं बोलायचं होतं. सुरुवातीला माझा मित्र बोलला. मग प्रतिस्पर्धी गटातली एक मुलगी बोलली. त्यानंतर मी बोलायला उभा राहिलो. सुरुवातीची दोन अडीच मिनिटे अगदी व्यवस्थित बोललो. त्यानंतर कविताही सादर केली. लोकांनी टाळ्या वाजवल्या. ज्यानंतर मला काही आठवेचना. मी जवळपास ४० सेकंद गप्प उभा राहिलो हे दिसल्यानंतर उपस्थितांनाही मला काही सुचत नाही हे समजलं. मग काही प्रमाणात हुर्योही करण्यात आला. मग मात्र मी बोललो. काय बोललो ते आठवत नाही मात्र वेळ मारुन नेली. त्या स्पर्धेचं बक्षीस आम्हाला मिळालं नाही.”

” त्यानंतर काही महिन्यांनी आणखी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत मात्र छान तयारी करुन भाग घेतला आणि पहिला आलो ” असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आपल्या दिलखुलास उत्तरांनी त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली.

 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2020 at 17:42 IST

संबंधित बातम्या