गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. त्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर आल्या. शिवसेना, भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. तसंच गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली. या सगळ्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडली.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान सांगितलं की ते पंकजा मुंडेंना म्हणाले होते आमच्या पक्षात या तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करु. याबाबत मला प्रश्न विचारला गेला तेव्हा मी गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगितली होती. मी तो प्रसंग सांगितला होता. गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मी जे काही बोललो ते योग्यच होतं. गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात येणार होते. सगळा घटनाक्रमही ठरला होता. त्यावेळी सगळं काही व्यवस्थित झालं असतं आणि गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात आले असते तर आम्ही २०१४ ची निवडणूक आम्ही हरलो नसतो. गोपीनाथ मुंडे हे मास लीडर होते. त्यांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे नव्या पिढीला तो समजला पाहिजे, त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
तर गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री व्हावेत म्हणूनही प्रयत्न केले असते-चव्हाण
जर २०१४ ला आमचं सरकार निवडून आलं असतं तर त्यांनी मला मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं. पृथ्वीराज चव्हाण चालणार नाहीत असं आमचे सहकारीही म्हटलं असतं. त्यावेळी मी स्वतः गोपीनाथ मुंडेंचं नाव सुचवलं असतं. त्यांच्याबाबत माझ्या मनात नितांत आदर होता. आमच्या एकमेकांच्या भेटी झाल्या होत्या. त्यांचं राजकीय नुकसान झालं, मी दिलगिरीही व्यक्त केली होती. पण गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर होता. मला ते नेहमी म्हणायचे की नागपूरचे दोघंजण मला निवडून येऊ देणार नाहीत. ते कुणाचा उल्लेख करायचे हे मला माहीत नाही असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. भाजपात त्यांना योग्य स्थान मिळालं नाही. त्यांना मुख्यमंत्री हे पद मिळायला हवं होतं. ते त्यांना मिळालं नाही पण हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे.
गोपीनाथ मुंडेंचा जो मृत्यू झाला…
संजय राऊत यांनी जे विधान केलं की गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते तर आज जिवंत असते याबाबत विचारलं तेव्हा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की याबाबत मी काही बोलणार नाही. त्यांचा जो अपघाती मृत्यू झाला, त्याचं आम्हाला आश्चर्य वाटलं. कारण एक तरुण नेता आपल्याला सोडून गेला. पण त्याबाबत मला यापलिकडे काही माहिती नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
