सोलापूर : काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल अखेर भारत राष्ट्र समिती पक्षात

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय सोलापुरातील काँग्रेसचे नेते, माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी अखेर जाहीर केला आहे.

Former Congress MP Dharmanna Sadul
सोलापूर : काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल अखेर भारत राष्ट्र समिती पक्षात

सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय सोलापुरातील काँग्रेसचे नेते, माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी अखेर जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवर धक्का बसला आहे. के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समितीचा विस्तार करीत महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याची सुरूवात नांदेड  जिल्ह्यातून झाली आहे. तेलुगुभाषक असलेल्या सोलापूरकडेही त्यांचे लक्ष आहे. त्यादृष्टीने ते गेल्या दोन  महिन्यांपासून माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्या संपर्कात आहेत.

भारत राष्ट्र समितीमध्ये (बीआरएस)  प्रवेश करण्यासाठी त्यांनी सादूल यांना गळ घातली असता सुरूवातीला त्यांनी काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला होता. तरीही चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेले चंद्रकांत रेड्डी यांनी सादूल यांच्याकडे सतत पाठपुरावा चालविला होता. तेव्हा सादूल यांनी आपल्या काही सहका-यांशी सल्लामसलत करून कानोसा घेतला असता बहुसंख्य सहका-यांनी काँग्रेसपेक्षा भारत राष्ट्र समितीचे व्यासपीठ अधिक चांगले आहे. त्या पक्षात प्रवेश केल्यास खूप चांगले कार्य करता येईल, असे मत मांडले. तेव्हा विचारपूर्वक आपण जड अंतःकरणाने काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेऊन बीआरएसमध्ये जाण्याचे ठरविल्याचे सादूल यांनी सांगितले.

हेही वाचा >>> सांगली : महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडीला लाखाचे बक्षिस जाहीर

वयाची ८० वर्षे ओलांडलेले सादूल हे तेलुगुभाषक पद्मशाली विणकर समाजातील काँग्रेसचे नेते असून गेली ५० वर्षांपासून पक्षात कार्यरत आहेत. १९७४ साली प्रथमच ते नगरसेवक झाले होते. नंतर १९८८-८९ साली त्यांना काँग्रेसने महापौरपदाचा बहुमान दिला होता. त्याचवेळी-१९८९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यानंतर पुन्हा १९९१ साली लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा निवडून आले होते. दरम्यान, १९९९ साली  काँग्रेसमधून शरद पवार यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली असता सादूल यांनी पवार यांचे नेतृत्व स्वीकारून काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याच सुमारास झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असता त्यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा सादूल यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतणे पसंत केले होते. अलिकडे आजारपण व इतर कारणांमुळे ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 18:44 IST
Next Story
सांगली : महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडीला लाखाचे बक्षिस जाहीर
Exit mobile version