कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांनी बुधवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
खासदार धनंजय महाडिक, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, रामचंद्र डांगे, महेश देवताळे, विजय भोजे, भगवान काटे, शैलेश आडके, विजय माणगावे, मिलिंद साखरपे, सतीश हेगाणा, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे पाठबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मादनाईक यांचे स्वागत करून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. भाजप भविष्यात पाठबळ देईल, अशी ग्वाही दिली. सावकार मादनाईक यांच्या भाजप प्रवेशासाठी माधवराव घाटगे यांनी पुढाकार घेत कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत सकारात्मक चर्चा सुरू ठेवली होती.
मादनाईक यांच्या रूपाने भाजपला शेतकरी चळवळीच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व मिळाले असल्याने तालुक्यातील भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. माधवराव घाटगे यांच्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचा उल्लेख मादनाईक यांनी यावेळी केला.