महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना छातीत दुखू लागल्यामुळे केईएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तसेच त्यांचा रक्तदाब वाढला असून त्यांची लवकरच वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनिल देशमुख १०० कोटी वसूली प्रकरणी सध्या सीबीआय कोठडीत आहेत.

खांद्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी

नोहेंबर २०२१ मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली होती. देशमुखांनी या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली होती. याचिकेत त्यांनी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मागितली होती. परंतु न्यायालयाने त्यांना शहरातील जेजे रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश दिले होते.

काय आहे भ्रष्टाचाराचे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर देशमुखांना गृहमंत्रीपद सोडावे लागले होते. नंतर सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचारावरुन गुन्हा दाखल केला होता.