माजी मंत्री अनिल बोंडे यांना अटक व सुटका ; अमरावती हिंसाचारप्रकरणी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कारवाई

अमरावतीत हिंसक प्रतिक्रिया उमटल्यानंतर शनिवारी त्याच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी ‘अमरावती बंद’चे आवाहन केले होते.

डॉ. अनिल बोंडे

अमरावती : भाजपच्या ‘अमरावती बंद’दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. बोंडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. शहरातील संचारबंदी कायम असून, इंटरनेट सेवाही ठप्प आहे.

त्रिपुरातील हिंसाचाराचे महाराष्ट्रातही पडसाद उमटले. त्याची अमरावतीत हिंसक प्रतिक्रिया उमटल्यानंतर शनिवारी त्याच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी ‘अमरावती बंद’चे आवाहन केले होते. या दरम्यानही हिंसाचार झाला. या प्रकरणात अनेक भाजप नेते व पदाधिकाऱ्यांसह एकूण शंभराहून अधिक जणांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. त्यात बोंडे यांच्यासह भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, महापौर चेतन गावंडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, स्थायी समिती सभापती राधा कुरील, सभागृह नेते तुषार भारतीय, नगसेवक अजय सामदेकर, सुरेखा लुंगारे, संजय अग्रवाल यांचा समावेश आहे. त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिंसाचाराच्या प्रकरणात आतापर्यंत शंभराहून अधिक जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली.

नागरिकांचे हाल

अमरावती शहरात भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सोमवारी दुपारी २ ते ४ या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ासाठी संचारबंदी शिथिल करण्याचा आदेश काढण्यात आला, पण सर्व संपर्क यंत्रणा ठप्प असल्याने याबाबत दुकानदारांपर्यंत माहितीच पोहोचू शकली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former maharashtra minister anil bonde arrested in connection with amravati violence zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली