सांगली : विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा राजीनामा देऊन मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

खानापूर तालुक्यातील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सोमवारी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनादिवशी विट्याच्या पाटील गटाने आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी आ. सत्यजित देशमुख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, खानापूर मतदार संघातून महायुतीची उमेदवारी सुहास बाबर यांना जाहीर होताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करून महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

नजीकच्या काळात पाटील कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या विटा नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर बाबर गटाने यावेळी कोणत्याही स्थितीत नगरपालिकेची सत्ता मिळवायचीच यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप प्रवेशानंतर बोलताना पाटील म्हणाले, की मतदारसंघ व विटा शहराचा विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी देशपातळीपासून गाव पातळीपर्यंत सक्रिय असलेल्या भाजपशिवाय पर्याय नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे.