नेतृत्वाकडून दुर्लक्ष झाल्यानेच सेनेचे माजी राज्यमंत्री काँग्रेसवासी?

विद्यार्थी राजकारणात अग्रेसर असणाऱ्या अशोक शिंदेंनी हिंगणघाटमध्ये सेनेचा भगवा उंचावला. पाळेमुळे घट्ट केली. संघटना वाढवली.

माजी राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी मंगळवारी मुंबईत टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

|| प्रशांत देशमुख
वर्धा : शिवसेनेत नगरसेवक, आमदार, मंत्री व शेवटी उपनेते हे मोठे पद भूषवणारे अशोक शिंदे यांना शिवसेना नेतृत्वाकडून दुर्लक्षित करण्यात आल्यानेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश के ला असावा, असा तर्क  व्यक्त के ला जात आहे.

कधी काळी सेनेच्या फक्त पाट्याच दिसतात, कार्यकर्ते दिसत नाहीत, असे काँग्रेस नेते हिणवत. त्या काळात विद्यार्थी राजकारणात अग्रेसर असणाऱ्या अशोक शिंदेंनी हिंगणघाटमध्ये सेनेचा भगवा उंचावला. पाळेमुळे घट्ट केली. संघटना वाढवली. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत ते उभे होते. मात्र पराभूत झाले. नंतर १९९५ ला शरद जोशींचा पराभव करून ते आमदार झाले. त्यांच्या नेतृत्वात पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेनेला यश मिळत गेले. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनुभवी नगरसेवक व त्यांचे विश्वासू राजेंद्र खुपसरे यांना डावलून त्यांनी समीर कुणावार यांना उमेदवारी दिली. आता आमदार असलेल्या कुणावार यांचा राजकीय प्रवेश सेनेतून शिंदेंच्या मार्गदर्शनात थेट नगराध्यक्षपदी झाला. यानंतर दोन वेळा आमदार होण्याची संधी शिंदेंना मिळाली. नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी सहा महिन्यांसाठी मंत्रिपदही भूषवले. पक्षाची सत्ता नसताना पक्ष उपनेते हे पदही त्यांना लाभले. शिंदेंचा उंचावणारा राजकीय प्रवास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच आशीर्वादाने झाल्याचा दाखला ते स्वत:च देतात. शेवटी गत निवडणुकीत पाचव्या क्रमांकावर त्यांची घसरण झाली.

पुढे मात्र शिंदेंकडे उपनेतेपद असूनही सेनेला जिल्ह्यात वाढता आले नाही. हे पद असणाऱ्या व्यक्तीने विदर्भात आणखी किमान एक आमदार निवडून आणणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यातही ते आमदार तर सोडाच, परंतु एक नगराध्यक्षही निवडून आणू शकले नाही. शिंदे इतरांना मोठे होऊच देत नाहीत. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करतात. कधीच कार्यकर्त्यांना मानसन्मान देत नाही. भेटीगाठी टाळतात. पक्षाच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत नाहीत, हे त्यांच्यावरील मोठे आक्षेप राहिले. त्याच्या तक्रारी सातत्याने शिवसेना भवनात अनिल देसाईंकडे झाल्या. भाकरी फिरवावी लागते, अन्यथा जिल्ह्यात पक्ष करपेल, असे सेनेच्या वरिष्ठांकडे निरोप गेले. याच पार्श्वभूमीवर २०१८ मध्ये माजी खासदार अनिल गुढे यांची वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नेमणूक झाली आणि शिंदे आक्रसले. गुढे यांनी शिंदेंमुळे नाराज निष्ठावंतांना परत गोळा करणे सुरू केले. त्याचे पहिलेच फळ भाजपच्या दहा नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केल्याने मिळाले. शिंदेंचे नेतृत्व नसणारी सेना आम्हाला चालते, असे उघड बोलत हे नगरसेवक गुढेंच्या नेतृत्वात थेट मातोश्रीत भेटून आले. त्यांचा लगेच हिंगणघाटला कार्यक्रमही झाला. त्याच वेळी शिंदे सेनेतून हकालपट्टी झालेल्यांसोबत आर्वी दौरा करीत होते.

राजेंद्र खुपसरे म्हणतात, मी म्हणजेच सेना ही शिंदेंची भावना पक्षाला कमकुवत करणारी ठरली. त्यामुळे पक्ष वाढू शकला नाही. दुसरी बाब म्हणजे, त्यांचा स्वभावदोष. दुखावलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा संच आज पुन्हा सेनेशी जुळला आहे. शिंदेंची काँग्रेससोबत कुणीही पाठराखण केलेली नाही. शिंदे हे पक्ष सोडण्याबाबत भाष्य करीत नाहीत. मात्र काँग्रेस हा सर्व जातीधर्माला व विविध गटांना घेऊन चालणारा, शेतकऱ्यांचे हित पाहणारा पक्ष असल्याने त्यात प्रवेश केल्याचे नमूद करतात.

वर्षभरापूर्वी माझ्या निवासस्थानी सहा तास झालेल्या बैठकीत मी शिंदेंना सर्व बाबी अवगत केल्या होत्या. नेतृत्वाकडून दुर्लक्ष होऊ शकते, पण त्यामुळे विचलित होण्याचे कारण नाही. पण तरीही त्यांनी समजून न घेता तºहेवाईक वागणूक ठेवली. पक्षाची कुठेही वाढ दिसून येत नव्हती. म्हणून वरिष्ठांनी मला जबाबदारी सोपवली. जबाबदारी मिळाल्यानंतर मी प्रत्येक बाबतीत शिंदेंना विश्वासात घेत होतो, त्यांनी मात्र विश्वास दाखवला नाही. त्यांच्या पक्ष सोडण्याने सेनेवर तिळमात्र परिणाम होणार नाही.   – अनंत गुढे, जिल्हा संपर्क प्रमुख

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former minister state congress congressman negligence leadership akp

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या