Aniket Tatkare Drove Sunetra Pawars Car : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काल (२० फेब्रुवारी रोजी) चिपळूणातील सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. सुनेत्रा पवार उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच रत्नागिरी दौरा होता. त्यांच्या समवेत माजी आमदार अनिकेत तटकरे तसेच अजित यशवंतराव उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवारांच्या गाडीचं सारथ्य विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केलं. त्यांच्या या कृतीमुळे आता सर्वत्र टीकेची झोड उठली आहे.

चिपळूणचे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सावर्डे येथे गेल्या होत्या. तिथपर्यंत त्यांनी खासगी हेलिकॉप्टरने प्रवास केला. तर, विवाहस्थळापर्यंत त्या चारचाकी गाडीने गेल्या. यावेळी चारचाकीचं सारथ्य अनिकेत तटकरे यांनी केलं. गाडीत असलेल्या शासकीय चालकाला गाडीतून उतरवून अनिकेत तटकरे यांनी स्वतः गाडीचं स्टेअरिंग हाती घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. अजित पवारांचं नुकतंच अपघाती निधन झालं आहे, त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री दर्जाच्या सुनेत्रा पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग इतर कोणाच्याही हातात देणं धोकादायक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

परवाना आहे का? विचारलं का कोणी?

राष्ट्रवागी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी संदीप उदमले म्हणाले, “अजित पवारांचं नुकतंच अपघाती निधन झालंय. हा घातपात असल्याबाबत शंका आहे. त्यामुळे, उपमुख्यमंत्री दर्जाच्या सुनेत्रा ताई यांना झेड किंवा वाय दर्जाची सुरक्षा असताना, एवढे सुरक्षा असतानाही अनिकेत तटकरेंनी गाडी कशी चालवली? त्यांच्याकडे गाडीचा परवाना आहे का? असंतरी एका सुरक्षा रक्षकाने विचारलं का? घातपात झाला असता तर जबाबदार कोण?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

निष्काळजीपणामुळे अजित पवारांचं निधन झालेलं असताना…

“अनिकेत तटकरे हे आमच्या पक्षाचे माजी आमदार राहिले आहेत. पण प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. अजित पवारंचं निधन निष्काळजीपणामुळे झालं आहे. आम्ही आमचा बापमाणूस निष्काळजीपणामुळे गमावला आहे. त्यामुळे शासकीय प्रोटोकॉल मोडू नये”, अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली.

शासकीय प्रोटोकॉल पाळला गेलाच पाहिजे

“एकतर शासकीय वाहन वापरताना, शासकीय चालक असणे गरजेचे आहे. नियम आहे. उत्साहाच्या भरात काही अघटीत घडले तर त्याला जबाबदार कोण? सर्वांनी भान ठेवले पाहिजे”, असं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले.

मला यात गैर वाटत नाही

“आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या लग्नासाठी काकी काल सावर्डे येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीचं सारथ्य मी केलं. याआधीही अनेक वरिष्ठ नेत्यांचं सारथ्य केलं आहे. त्यामुळे कारण नसताना हा वाद का वाढवला जातोय, हे माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे आहे. ज्या काही कुटुंबातील सदस्य येतात, त्यांचं स्वागत करणं, सारथ्य करणं यात गैर वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया अनिकेत तटकरे यांनी दिली.