Aniket Tatkare : आमदार शेखर निकम यांच्या लग्नाच्या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चिपळूण येथील सावर्डे येथे गेल्या होत्या. हेलिपॅड ते विवाहस्थळापर्यंत त्या चारचाकी वाहनाने तिथे पोहोचल्या. यावेळी त्यांच्या वाहनाचं सारथ्य विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केलं. यावरून राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. त्यांच्या या कृतीवर टीकेची झोड उठली आहे. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात नुकतंच अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. निष्काळजीपणामुळे अजित पवारांचं निधन झालं असताना आता तरी काळजी घेतली पाहिजे, असं अनेकांचं म्हणणं आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शासकीय चालकाला उतरवून स्वतः गाडीचं सारथ्य केलं, अशी टीका त्यांच्यावर केली जातेय. यावर अनिकेत तटकरे म्हणाले, आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या लग्नासाठी काकी काल सावर्डे येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीचं सारथ्य मी केलं. याआधीही अनेक वरिष्ठ नेत्यांचं सारथ्य केलं आहे. त्यामुळे कारण नसताना हा वाद का वाढवला जातोय, हे माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे आहे. राष्ट्रावादीच्या कुटुंबातील सदस्य येतात, त्यांचं स्वागत करणं, सारथ्य करणं यात गैर वाटत नाही.”
ते वाहन शासकीय नव्हतं
“सुनेत्रा पवार ज्या वाहनाने विवाहस्थळापर्यंत पोहोचल्या ते शासकीय वाहन नव्हतं. त्यामुळे त्यात शासकीय चालकही नव्हता. काकी येणार म्हणून मी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आम्ही एक खासगी वाहन उपलब्ध केलं होतं. याआधी दादांकरताही असं नियोजन आम्ही करत होतो. त्यामुळे खासगी वाहनात चालक म्हणून बसणं यात मला गैर वाटत नाही”, असंही स्पष्टीकरण अनिकेत तटकरे यांनी दिलं.
टीका करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे
दरम्यान, अनिकेत तटकरे यांच्याकडे चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना आहे का? याबाबतही शंका विचारण्यात आली. त्यावर अनिकेत तटकरे म्हणाले, “मला तर प्रश्न विचारणाऱ्यांच्या आकलेबाबत शंका आहे. मी एक सुविज्ञ नागरिक आहे. मला माझ्या कर्तव्याची आणि मर्यादांची जाणीव आहे. १८ वर्षांच्या खालील मुलाने गाडी चालवली का? मी अनेक वर्षे गाडी चालवत आलो आहे. मी अनेक झेड प्लस दर्जाच्या नेत्यांचं सारथ्य केलं आहे. त्यामुळे खोडसाळपद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असंही स्पष्टीकरण अनिकेत तटकरे यांनी दिलं.
