माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन

प्रवरा नदीपटय़ातील लाख कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

श्रीरामपूर : पुरोगामी विचारांचे व पाणीप्रश्नांचे गाढे अभ्यासक माजी आमदार अ‍ॅड. दौलतराव मल्हारी पवार (वय ८२) यांचे आज दुपारी येथील कामगार रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पूणतगाव ( ता. नेवासे) येथे उद्या, गुरुवार दि.११ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

पवार हे मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. पुणे येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. दरम्यान, त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तेथे त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुभद्राबाई, चार मुले , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सुधाकर, अ‍ॅड. भागवत, अनिल व डॉ. शरद पवार यांचे ते वडील होत.

पवार हे कृषी व विधी पदवीधर होते. त्यांनी सहकार, ग्रामीण विकास, शेती व पाणी या क्षेत्रात काम केले. सन १९८५ साली ते श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून समाजवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. राजकारणासह त्यांनी सहकार आणि कृषी क्षेत्रातही भरीव कार्य केले. सह्यद्री पर्वतरांगेतील समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे. तसेच आवर्षणग्रस्त भागाला पाणीपुरवठय़ासाठी त्यांनी विधिमंडळात आवाज उठविला होता.

येथील प्रवरा नदीपटय़ातील लाख कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते येथील मुळाप्रवरा वीजसंस्थेचे माजी अध्यक्ष, अशोक साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि विचार जागर मंचाचे अध्यक्ष होते. शेतकरी संघटनांसह श्रीरामपूर जिल्हा कृती समितीसाठी त्यांनी काम केले.

’  सामाजिक चळवळीतील शिलेदार हरपला- विखे

’ माजी मंत्री राधाकृष्ण विखे – माजी आमदार दौलतराव पवार यांच्या निधनाने सामाजिक चळवळीतील एक शिलेदार आणि पाणीप्रश्नावर ठामपणे भूमिका मांडणारे व्यक्तिमत्त्व  गमावले. पवार यांनी  आपल्या सर्व राजकीय सामाजिक वाटचालीत सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. चळवळीच्या माध्यमातून प्रश्नांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा ध्यास त्यांचा असायचा.

’ आमदार लहू कानडे – पवार हे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. पाणीप्रश्नाचे ते गाढे अभ्यासक होते. गोरगरिबांसाठी त्यांनी काम केले.

’ माजी आमदार भानुदास मुरकुटे – पवार हे माझे मित्र होते. ते अजातशत्रू होते. त्यांनी तालुका विकासात मोठे योगदान दिले. पाणीप्रश्नांवर सातत्याने लढणारा जागरूक नेता हरपला.

’ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक – सहकार, शिक्षण, पाणी, पत्रकारिता या क्षेत्रात काम करणारा नेता हरपला. ते अभ्यासू व मनमिळाऊ होते. आदिक कुटुंबाचे ते स्नेही होते. त्यांनी राजकारणात कधी कुणाला त्रास दिला नाही. त्याचा सर्व क्षेत्राचा अभ्यास होता. गरिबांसाठी त्यांनी काम केले.

’ नगराध्यक्षा अनुराधा आदिक – अत्यंत अभ्यासू असलेले पवार हे माझे मार्गदर्शक होते. गरिबांसाठी त्यांनी काम केले. त्यांचे योगदान विसरता येणार नाही.

’ माजी आमदार भाऊसाहेब कांबळे – आज सकाळी पवार यांना मी भेटलो. त्यांनी मला मार्गदर्शन केले. ते राजकारणातील सोज्वळ व प्रामाणिक नेते होते.

’ जलसपंदा मंत्री शंकरराव गडाख  ज्येष्ठ नेते माजी आमदार दौलतराव पवार यांच्या निधनाने एक अभ्यासू, समाजनिष्ठ, सर्वधर्मसमभाव जपणारा, शेतकरी व शासनाचा मार्गदर्शक नेता हरपला. घाट माथ्यावरील पाणी गोदावरीत वाळवावे यासाठीच्या लढय़ात त्यांचे मोठे योगदान आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former mla daulatrao pawar passes away zws