सोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या सुमारे ३१२ कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेली आठ वर्षे अटकेत असलेले माजी आमदार रमेश कदम यांची जामीनवर सुटका झाल्यानंतर त्यांचे प्रथमच मोहोळ शहरात आगमन झाले. तेव्हा हजारो समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यातून कदम यांचे वलय अजूनही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण मोहोळमध्ये पुन्हा राजकीय वादळ घोंगावण्याची चिन्हे दिसत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून रमेश कदम हे २०१४ साली प्रथमच निवडून आले होते. त्यानंतर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाचे अध्यक्षपदाची जबाबदारी कदम हे संभाळत असताना महामंडळात बनावट कर्जप्रकरणे, बनावट अनुदानाची प्रकरणे उजेडात आली होती. या घोटाळ्यात दुसरे-तिसरे कोणी नसून तर स्वतः रमेश कदम हेच अडकले होते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात सुमारे ३१२ कोटींचा घोटाळा उजेडात आल्यामुळे अखेर कदम यांच्या हातात बेड्या पडल्या होत्या. मुंबईच्या आॕर्थर रोड कारागृहात कदम यांना तब्बल आठ वर्षे काढावी लागली. सोलापुरातही त्यांच्यावर फसवणुकीचे काही गुन्हे दाखल होते. घोटाळ्यात अडकल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने कदम यांना सुरूवातीलाच पक्षातून बडतर्फ केले होते. अटकेपूर्वी आमदारकीच्या अल्पशा काळात कदम यांनी मोहोळ तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत गावोगावी स्वतःचे खासगी टँकर पाठवून पाणीपुरवठा केला होता. मागेल त्याला रस्ता ही त्यांची घोषणाही जनतेच्या पसंतीला उतरली होती. तथापि, मोहोळ मतदारसंघातील विकास प्रश्नांसाठी कदम यांनी सोलापुरात मोर्चा काढला होता.
हेही वाचा >>>सांगली : शिक्षक बँकेच्या सभेत गदारोळ, विरोधकांची समांतर सभा
त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर कदम यांनी अश्लील भाषेत टीका केली होती. आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या घोटाळ्यात अटकेत असतानाही त्यांनी मागील २०१९ सालची मोहोळ राखीव विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून तुरूंगातूनच लढविली होती. त्यावेळी त्यांना घसघशीत २५ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. अलिकडे राज्यात राजकीय समीकरणे पुन्हा बदलली असतानाच गेल्या महिन्यात रमेश कदम यांची सशर्त जामिनावर सुटका झाली. त्यानंतर ते प्रथमच मोहोळमध्ये दाखल झाले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आघाडीवर होती. मनसेने स्वागतासाठी मोहोळ परिसरात सुमारे २५० डिजिटल फलक झळकावले होते. कदम यांच्यावर हारतु-यांसह फुलांची मुक्त उधळण करण्यात आली. फटाक्याच्या आतषबाजी आणि हलगी, ढोलताशांच्या कडकडाट अशा वातावरणात झालेल्या कदम यांच्या स्वागतासाठी तरूणाईची मांदियाळी दिसून आली. या स्वागतातून कदम यांचे वलय अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळाल्यामुळे मोहोळ तालुक्यातील राजकारणात ते कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.