माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणात सत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, सत्तेचा वापर करून त्यांनी दिशा सालियन प्रकरणाची फाईल बंद केली. मात्र, आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ही फाईल पुन्हा उघडली असून, दाल मे बहुत कुछ काला है हे त्यातून स्पष्ट होत असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

“सीबीआय दिशाच्या कुटुंबाला न्याय देईल. आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या मुलींना हा विश्वास दिला आहे की मी फक्त तोंडाने लाडकी बहीण म्हणत नाही. तर लाडक्या बहिणीसह कुणी अन्याय केला तर मी सोडणार नाही. आम्हाला खूप विश्वास आहे की न्याय मिळेल. दिशा सालियनच्या मृत्यूच्या वेळी जे सत्तेत होते त्यांनी सत्तेचा कसा दुरुपयोग केला त्यावेळी हे सगळ्यांना माहीत आहे. आता सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाची फाईल परत ओपन केली आहे यावरुन हे स्पष्ट होतं आहे की दाल मे बहुत कुछ काला है.” असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

८ जून २०२० ला दिशा सालियनचा मृत्यू

८ जून २०२० ला दिशा सालियनचा मालाड येथील राहत्या घरातून पडून मृत्यू झाला होता. दिशाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह तिने काही काळ काम केलं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सविस्तर तपास करत दिशाने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मार्च २०२५ मध्ये देशाचे वडील सतीश सालियन यांनी दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दिशाचे वडील सतीश सालियन काय म्हणाले?

आमच्याकडे जे काही पुरावे होते ते सगळे आम्ही सीबीआयला दिले आहेत. तसंच आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत. त्यांना आणखी काही मदत लागली तर आम्ही ती देखील करू असं सतीश सालियन यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्याकडे सबळ पुरावे आहेत म्हणूनच आम्ही हिंमतीने हा लढा देत आहोत. त्यांना विचारण्यात आलं की यात कुठली मोठी नावं आहेत? त्यावर सतीश सालियन म्हणाले, “आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली यांची प्रामुख्याने नावं आहेत. तसंच हा गुन्हा लपवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यात सचिन वाझे, परमवीर सिंग, रिया चक्रवर्ती ही नावं आहेत. आत्तापर्यंत जाणीवपूर्व हे प्रकरण दाबलं गेलं. सहा वर्षे केस चालण्याची गरजच नव्हती.” असं सतीश सालियन म्हणाले.