मंदार लोहोकरे, पंढरपूर
सोलापुरात आलेले अटलजी हे अनेकदा पंढरीला धाव घ्यायचे. कार्यकर्त्यांमध्ये रमणारे, त्यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या अटलजींना या भूमीत आले, की त्या सावळय़ा पांडुरंगाच्या दर्शनाची देखील ओढ असायची. ते घेता घेताच ते सामान्यजनात मिसळायचे. आज ते गेल्याचे समजताच आमचा ‘विठ्ठल’च आम्हाला सोडून गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.




पंढरपुरातील भाजप, संघाचे कार्यकर्ते, विठ्ठल मंदिर, सामान्यजन आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे ऋणानुबंध खूप घट्ट होते. अटलजी या नात्यातून आणि त्या विठ्ठलाच्या ओढीने तब्बल ५ वेळा या छोटय़ाशा शहरात आले. मात्र ज्या ज्या वेळेस ते पंढरपूरला आले त्या त्या वेळेस त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, त्यांच्या बरोबर भोजन, न्याहारी, गप्पा मारणे पसंत केले. येथील माजी शहराध्यक्ष उमेश वाघोलीकर यांना या आठवणी सांगताना गहिवरून आले. अटलजी हे कार्यकर्त्यांसाठी साक्षात विठ्ठलच आहेत. १९८८ मध्ये अटलजी हे सोलापूरचा दौरा आटोपून पंढरपूर मार्गे सांगलीला जाणार होते त्या वेळेस गोपाळराव डबीर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. डबीर हे भाजपचे जुने कार्यकर्ते होते. ही बातमी वाजपेयींना समजताच पंढरपूर येथे थांबून त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केल्याची आठवण वाघोलीकर यांनी सांगितली.
वाजपेयी एकदा पंढरपूर येथे मुक्कामी आले होते. या वेळेच्या अटलजींच्या जेवणाची आठवण वाघोलीकर यांनी सांगितली. उकडलेल्या भाज्या आणि दूध हे अटलजींचे भोजन होते.
त्यांच्या भोजनाची व्यवस्था पाहण्याचे काम माझ्याकडे आले होते. त्यांना हवा तसा साधाच पण निराळा बेत तयार केला. तो पाहताच त्यांनी विचारले, ‘काली मिरची मिलेगी!’ हे ऐकताच मी गोंधळलो. कारण मला हिरवी आणि लाल मिरची माहीत होती. मग मी या बाबत गोपीनाथ मुंडे यांना विचारले, यावर त्यांनी ‘वाटीत थोडे काळे तिखट दे’ असे मला सांगितले.
ते देताच वाजपेयींनी आमच्याकडे हसत पाहत कशी फिरकी घेतली असा मिस्कील भाव व्यक्त केला.
पंढरपुरात आलेल्या अटलजींना त्या सावळय़ा विठ्ठलाच्या दर्शनाची देखील ओढ असायची. वाजपेयी खरेतर ‘आर्य समाज’ मानणारे, पण पांडुरंगाची भक्ती याला अपवाद होती. तब्बल पाच वेळा वाजपेयी विठ्ठलाच्या या राऊळी आले
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमचा ‘विठ्ठल’च आज सोडून गेला, अशी भावना प्रत्येकाच्या तोंडी उमटत होती.
caption