Sukhbir Singh Badal Attack Nanded Gurudwara: शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड साहिब गुरुद्वारात निहंग गटाने त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. सुखबीर सिंग बादल आपली पत्नी आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह गुरुद्वारात आले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.

गुरुद्वारात आल्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका निहंगाने तलवारीने त्यांच्या हातावर आणि खांद्यावर वार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी चार निहंग तिथे उपस्थित होते. बादल यांच्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून हल्लेखोराला बाजूला केले. हल्लेखोर निहंगाला पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुद्वाऱ्यात हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्येही अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. धार्मिक शिक्षा मिळाल्यानंतर सुखबीर सिंग बादल सुवर्ण मंदिरात सेवादार म्हणून सेवा देत होते. यावेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता.

गुरुद्वाऱ्यातील हल्ल्यानंतर सुखबीर सिंग बादल यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वृत्त समोर आले आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, बादल यांच्या हाताला जखम झाली असून रुग्णालयात जाताना त्यांनी तख्त साहिब गुरुद्वारात सत्कारानिमित्त मिळालेला सिरोपा (सन्मानवस्त्र) हातावर गुंडाळलेले दिसत आहे. सुखबीर सिंग बादल यांनी काल तख्त श्री पाटणा साहीब गुरुद्वारात दर्शन घेतले होते. त्यानंतर ते तख्त श्री हजूर साहिब गुरुद्वारात पोहोचले होते.

सुखबीर सिंग बादल यांच्या एक्स अकाऊंटवर सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी तख्त श्री हुजूर साहिब गुरुद्वारातील व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि भटिंडाच्या खासदार हरसिमरत कौर बादल, दोन मुली आणि जावई आणि त्यांचा मुलगा उपस्थित होता.

ताजी अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर यांच्याशी संवाद साधत सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिरोमणी अकाली दल पूर्वी भाजपाप्रणित एनडीएचा घटक पक्ष होता. पंतप्रधान मोदी आणि बादल कुटुंबीयांचे जवळचे संबंध आहेत.