अलिबाग – उध्दव ठाकरे यांचा रायगड जिल्ह्यातील आणखिन एक मोहरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सह संपर्क प्रमुख किशोर जैन यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. स्नेहल जगताप, तुकाराम सुर्वे यांच्या पाठोपाठ किशोर जैन यांनाही पक्षात घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तटकरे यांनी मोठा धक्का दिला आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूकीत शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करत निवडणूक लढवली होती. कर्जत, खालापूर, माथेरान, मुरुड जंजिरा येथे दोन्ही पक्ष शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती विरोधात एकत्रित लढले होते. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला होता. कर्जत आणि मुरुड नगरपालिका जिंकण्यात राष्ट्रावादी काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाचे योगदान महत्वाचे ठरले होते. मात्र नगरपालिका निवडणूक संपताच, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना उध्दव ठाकरे गटाला मोठा दणका दिला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा सह संपर्क प्रमुख किशोर जैन राष्ट्रवादी काँग्रेसचा गळाला लागले आहेत.
विधानसभा निवडणूकीत पेण मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने किशोर जैन नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या चर्चांमध्ये तत्थ नसल्याचे ते वेळोवेळी सांगत होते. मात्र २९ डिसेंबरला त्यांनी आपल्या पदाचा आणि पक्षसदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पक्षसंघटनेसाठी वेळ देऊ शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले, पक्षाने तसेच पक्षनेतृत्वाने आजवर दिलेल्या संधीबाबत त्यांनी ठाकरे यांचे आभारही मानले. त्यांच्या राजीनाम्यानंतर नागोठण्यातील इतर पदाधिकऱ्यांनी आपले राजीनामे दिले. सोमवारी राजीनामे दिल्यानंतर आज मुंबईत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, अनिकेत तटकरे, मधु पाटील, राजीव साबळे, आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या तोंडावर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
