शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं शुक्रवारी सकाळी ११ वाजता डोंबिवलीत निधन झालं. सूर्यकांत देसाई हे ८३ वर्षांचे होते. सूर्यकांत देसाई यांना एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात नेत असताना अँब्युलन्स रस्त्यात बंद पडली त्यामुळे उपचारांअभावी सूर्यकांत देसाई यांचं निधन झालं. देसाई यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत असा आरोप देसाई यांच्या कुटुंबाने केला आहे.
सूर्यकांत देसाई यांची प्रकृती बिघडली आणि..
सूर्यकांत देसाई यांच्या विषयी मिळालेली माहिती अशी की त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यांना दुसऱ्या रूग्णालयात हलवण्यात येत होतं. त्यावेळी देसाई यांना ज्या रूग्णालयात नेण्यात येतं होतं ती अँब्युलन्स मधेच बंद पडली. काही वेळ रूग्णवाहिकेला धक्काही द्यावा लागला. मात्र ही रूग्णवाहिका सुरूच झाली नाही. त्यानंतर दुसरी रूग्णवाहिका बोलवण्यात आली.
दुसऱ्या रूग्णवाहिकेतून देसाई यांना दुसऱ्या रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी देसाई यांचा ईसीजी काढला मात्र तो ब्लँक आला. या प्रकरणी कुटुंबियांकडून रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे.
सूर्यकांत देसाई हे १९९५ ते २००० या कालावधीत लालबाग परळ मतदारसंघातून आमदार होते. मागच्या २३ वर्षांपासून देसाई हे डोंबिवली पश्चिम भागात असलेल्या काशीकुंज सोसायटीमध्ये राहात होते. भागशाळा मैदानाजवळ ही इमारत आहे.
देसाई यांच्या निधनाची बातमी कळताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, देसाई हे शिवसेनेचे जुने नेते आणि आमदार होते. माझी कारकीर्द त्यांच्यामुळे घडली. रुग्णवाहिका बंद पडल्याने त्यांचा उपचारअभावी मृत्यू झाला हे धक्कादायक आहे. यासंबंधीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून याची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी नांदगावकर यांनी केली.