नांदेड : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूरमधील बंगल्याचे नाव ‘देवघर’. चाकूर हे त्यांचे मूळ गाव नांदेड जिल्ह्यालगत असून त्यांच्या आधीचे केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे नांदेड म्हणजे त्यांच्यासाठी ‘गुरुबंधूं’चे घर ठरले. हे दोन्ही नेते पुट्टपार्थीच्या सत्य साईबाबांचे भक्त म्हणून ओळखले जात. चाकूरकरांच्या जाण्याने नांदेड – लातूर दरम्यानच्या ऋणानुबंधातील आणखी एक गाठ तुटून पडली आहे.
मराठवाड्यात नांदेड आणि लातूर या जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन व्यक्तींना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले, हा या दोन जिल्ह्यातील समान धागा. शंकरराव चव्हाण यांचे शिवाजीराव निलंगेकरांशी सख्य नव्हते, कारण ते वसंतदारा गटाचे निष्ठावान होते. पण चव्हाण आणि चाकूरकर यांची राजकीय कारकीर्द एकमेकांस पूरक आणि समांतर राहिली. विधिमंडळात जाण्यापूर्वी दोघांनीही आपल्या शहराचे नगराध्यक्षपद भूषविले. राज्याच्या राजकारणात शंकरराव आधी मंत्री आणि मग मुख्यमंत्री झाले तर चाकूरकर यांना विधानसभा अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली.
लातूरच्या राजकारणात चाकूरकर आणि विलासराव देशमुख यांचा दबदबा १९८० नंतर सुरू झाला. विलासराव राज्याच्या राजकारणात स्थिरावत असताना चाकूरकर यांनी राजधानी दिल्लीतील केंद्रीय राजकारणामध्ये प्रवेश केला. १९८० नंतर दोन दशकांहून अधिक काळ दिल्लीमध्ये राहिलेल्या या नेत्याने राहणीपासून विचारसरणीपर्यंत आपली नाममुद्रा ठळख करत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास संपादन केला.
लोकसभा सभागृहातील त्यांची कारकीर्द २००४ साली संपली. राजकारणात प्रवेश करणा-या रूपाताई निलंगेकर यांनी त्यांचा पराभव केला, तरी काँग्रेस नेतृत्वाने त्यांचा अऩुभव, त्यांची प्रगल्भता विचारात घेऊन त्यांना राज्यसभेवर पाठविले आणि केंद्रीय गृहमंत्री केले या काळातील त्यांच्या उमदेपणाचा एक प्रसंगही आहे. राजधानी दिल्लीमध्ये नवख्या असलेल्या रूपाताईंची काँग्रेस श्रेष्ठींना ओळख करून देण्याचा मोठेपणा त्यांनी दाखविला. नंतर ते काही काळ पंजाबचे राज्यपाल राहिले.
२०१४ नंतर सक्रिय राजकारणातून मुक्त झालेले चाकूरकर अलीकडच्या काळात काँग्रेसपासून दुरावले होते, तरी काँग्रेसच्या विचारधारेतील एक पाईक ही त्यांची ओळख कायम राहिली. सन २००८ सालातील नांदेडमधील गुरू-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने एक व्यापक समिती जाहीर केली होती. या समितीचे अध्यक्षपद ज्येष्ठतेच्या निकषावर चाकूरकर यांच्याकडे सोपविण्यात आले. ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी नांदेड शहरासाठी भरीव निधी दिल्यामुळे अनेक विकास कामे त्यावेळी झाली. कुसुम सभागृहाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले होते.
