scorecardresearch

ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कालबद्ध योजना तयार करा; पेण अर्बन बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहारांमुळे गरीब खातेदार आणि ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले आहे, कोणत्याही परिस्थितीत गरिबांचे पैसे परत मिळाले पाहिजे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कालबद्ध योजना तयार करा; पेण अर्बन बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
तसेच ठाकरे गटाला फक्त आरोप करत राजकारण करायचं आहे. एक आरोप केला होता त्यात तोंडघशी पडले. कोर्टाने त्यांना जागा दाखवली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे.

अलिबाग:  पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहारांमुळे गरीब खातेदार आणि ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले आहे, कोणत्याही परिस्थितीत गरिबांचे पैसे परत मिळाले पाहिजे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करा तसेच जप्त मालमत्तांचा लवकरात लवकर लिलाव करून पैसे वसूल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील ठेवीदार आणि खातेदार संघर्ष समितीच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली.

बॅंकेच्या अध्यक्ष, संचालक मंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपली तरीही त्या परत मिळण्याची शक्यता नव्ह्ती, त्यामुळे या ठेवींमधून घेतलेल्या ३९ मालमत्ता गृह विभागाने जप्त केल्या आहेत. महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ठेवीदारांच्या पैशांमधून घेतलेल्या जागा सिडकोने खरेदी करुन ठेवीदारांचे पैसे परत देण्याचा एक पर्याय असून त्या दृष्टीने या जागांचे सिडकोने मूल्यांकन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री  शिंदे यांनी या वेळी दिले.

ठेवीदारांची सुमारे ६११ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची देणी असून हे सगळे गरिबांचे पैसे आहेत, ते त्यांना मिळालेच पाहिजेत, त्यासाठी जप्त मालमत्तांचा लिलाव करा, वसूली करा आणि हे पैसे परत करा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. सिडकोने या जप्त मालमत्तांचे मूल्यांकन तातडीने करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना दूरध्वनीवरून दिले.

सक्तवसुली संचालनालयाने जप्त केलेल्या मालमत्तांच्या ७/१२ उताऱ्यांच्या इतर हक्कामध्ये मालमत्तेची विक्री व हस्त्तांतरण करण्यात येऊ नये असा शेरा नोंदविला आहे, यामुळे मालमत्तांच्या विक्रीला अडचण येत असून हा शेरा मागे घेण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या