दीपक महाले

जळगाव : देशाचे रक्षण करताना प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबीयांना  जळगावातून मदतीचा हात दिला जात आहे. देशातील नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात. प्रसंगी त्यांना वीरमरणही येते.

त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, या भावनेतून येथील आर्या फाउंडेशन पुढे सरसावली असून, शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ६५ हजार रुपयांची मदत त्यांच्याकडून केली जात आहे.

सामाजिक कार्याची आवड असलेले नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेद्र पाटील यांनी समाजासाठी काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने आर्या फाउंडेशनची स्थापना नोव्हेंबर २०१४ मध्ये केली. फाउंडेशनच्या माध्यमातून होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्याचे कामही होत आहे. शिवाय, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांनाही मदत दिली जाते. करोनाकाळात डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पीपीई संचही उपलब्ध करून देण्यात आले. विविध राज्यांत नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप, कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत यासह अनेकांना आर्या फाउंडेशन मदतीचा हात देत आहे. जिल्ह्याच्या वेगवेगळय़ा भागांत विशेषत: आदिवासी भागांत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. २०२१ मध्ये जामनेर तालुक्यात चक्रीवादळग्रस्त ५० कुटुंबांना किराणा सामान देण्यात आले. केरळमधील पूरग्रस्तांसाठी तब्बल आठ टन जीवनावश्यक साहित्य फाउंडेशनने पाठवले होते.

आर्या फाउंडेशनशी देशभरातील १० लाख २६ हजार कुटुंबे जोडली गेली आहेत. त्यांच्यासह अनेक दात्यांकडून फाउंडेशनला अर्थसहाय्य केले जात असून, सामाजिक कार्याची दखल घेत २०१९ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानचिन्ह देत फाउंडेशनचा गौरव केला आहे. दरम्यान, आतापर्यंत २८ शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ६५ हजारांची धनादेशाद्वारे मदत देण्यात आली आहे.

मित्रपरिवाराकडून मदतीचा हात

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी डॉ. धर्मेद्र पाटील यांनी समाज माध्यमांद्वारे मदतीसाठी आवाहन करताच, त्यांचा बालमित्र, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मित्र, राज्यभरातील नेत्ररोगतज्ज्ञ आणि जळगावातील डॉक्टर मित्रपरिवार सढळ हाताने आर्या फाउंडेशनसाठी मदत उभी करीत आहे.

साताऱ्याच्या शहीद कुटुंबास मदत

काश्मीरमधील सांबा भागात देशसेवा निभावत असताना बामणोली तर्फ कुडाळ (ता. जावळी, जि. सातारा) येथील प्रथमेश पवार यांना नुकतेच वीरमरण आले. वीरमाता राजश्री पवार यांच्या नावाने ६५ हजारांचा धनादेश आर्या फाउंडेशनतर्फे सुपूर्द केला.

काश्मीरमध्ये आरोग्यसेवा देत असताना मी नेहमी भारतीय सैन्यासमवेत असतो. त्यांचे कष्ट अनुभवले आहेत. देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा आणि सीमेवरील जवानांचा हुरूप वाढावा, या उद्देशाने आपण ही मदत करीत असतो. समाजाने या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

– डॉ. धर्मेद्र पाटील (नेत्ररोगतज्ज्ञ तथा अध्यक्ष, आर्या फाउंडेशन, जळगाव)