कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात चार दिवस पाऊस

२९ नोव्हेंबरपासूनच पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे.

पुणे : राज्याच्या बहुतांश भागात सोमवारपासून पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पुणे, नाशिकसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ात काही भागांत चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. १ डिसेंबरला कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात ३० नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यानंतर पुढील ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. ३० ते २ डिसेंबर या कालावधीत प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २९ नोव्हेंबरपासूनच पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे.

कोकणात ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहणार असून, काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ४ डिसबेंपर्यंत पावसाळी वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात मात्र बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे.

पाऊसभान.. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३० नोव्हेंबरपासून पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रातील पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतही याच कालावधीत पाऊस असेल. मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळक ठिकाणीच पावसाचा अंदाज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Four days rain in konkan central maharashtra marathwada zws