लोटे एमआयडीसीमध्ये घरडा कंपनीत स्फोट, चारजण ठार,१ जखमी

आग आटोक्यात आल्यांनतर त्यांना बाहेर काढण्यात आले.

चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या रासायनिक उत्पादन घेणाऱ्या कारखान्यात शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटामध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.

कंपनीचे कनिष्ठ उत्पादन अधिकारी बाळासाहेब रामचंद्र गाढवे (वय ४९ वर्षे, खेर्डी, माळवाडी, चिपळूण), संशोधन अधिकारी आशिष चंद्रकांत गोगावले (३१,भागाडी-शिरळ, चिपळूण), मेंटेनस विभागाचे फिटर म्हणून काम करणारे महेश महादेव कासार (२६, भरणे, खेड) व उप व्यवस्थापक  राजेश फकिरा मानदकर(३९, घरडा कॉलनी, पिरलोटे) या चारजणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अभिजीत सुरेश तावडे (रा. चिपळूण) या जखमी कामगाराला उपचारांसाठी मुंबईला हलवले आहे.

स्फोटामागील कारण अजून कळलेले नाही.

मात्र कंपनीतर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रूपयांची नुकसानभरपाई, तर जखमी कामगारावरील उपचारांसाठी २० लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या वतीने ५ लाख रूपये देण्यात येणार आहेत. काही किरकोळ जखमी कामगारांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

घरडा कंपनीतील प्लांट क्रमांक ७ मध्ये सकाळी आठ वाजता सर्वसाधारण पाळी सुरू झाली. या प्लांटमध्ये काम करण्यासाठी अधिकारी आणि कामगार मिळून एकूण ४० जण रुजू झाले होते. उत्पादन प्रक्रिया सुरू असतानाच अचानक झालेला स्फोट व त्यातून निर्माण झालेल्या भीषण धुराचे लोट व आगीतून जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले. त्यांची गणना केली त्यात चार कामगार कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे ते प्लांटमध्येच अडकल्याचे लक्षात आले. आग आटोक्यात आल्यांनतर त्यांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा त्यांचा जागीच मृत्यू ओढवला, असे स्पष्ट झाले.

लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये सुप्रिया लाईफ सायन्स या कारखान्यात गेल्याच आठवड्यात अपघात होऊन तीनजण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ही वसाहत पुन्हा एकदा स्फोटांच्या आवाजांनी हादरली.

दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर इत्यादींनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Four killed one injured lotte midc blast akp

ताज्या बातम्या