जिल्ह्यात शनिवारी चार नवीन करोना रूग्णांची भर पडल्याने बाधितांची एकूण संख्या ४५ पर्यंत गेली आहे. नवीन रूग्णांमध्ये दोन भुसावळ आणि दोन जळगावचे आहेत.

शुक्रवारी रात्री आणि शनिवारी मिळून एकूण ७७ तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७० नकारात्मक, तर सात सकारात्मक आढळून आले. कोविड रूग्णालयातील संशयितांपैकी दोघांचे तपासणी अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाले. दोन्ही अहवाल सकारात्मक असून या दोन्ही व्यक्ती भुसावळच्या आहेत. एक ४२ वर्षांचा पुरूष, तर एक ५५ वर्षांची महिला आहे.

दुपारनंतर ३४ तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३२ अहवाल नकारात्मक, तर दोन व्यक्तींचे तपासणी अहवाल सकारात्मक आले आहेत. या दोन व्यक्तींमध्ये एक २४ वर्षांचा तरूण असून तो जळगावच्या मारूतीपेठ येथील रहिवासी आहे. दुसरी व्यक्ती २१ वर्षांची महिला असून ती मूळची चिचोंल (ता.बाळापूर, जि.अकोला) येथील आहे. सध्या ती जळगावच्या समतानगर येथे राहत होती. जिल्ह्यात करोना बाधित रूग्णांची संख्या आता ४५ झाली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.