उस्मनाबाद जिल्ह्यात सोमवारी चार नवे करोनाबाधित वाढले असून एकुण रुग्णांची संख्या आता १८३ वर पोहचली आहे. सोमवारी तुळजापूर तालुक्यात एक, भूम – दोन आणि लोहारा तालुक्यात एक जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. हे रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले असल्याने  त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे स्थानिक संसर्गही वेगाने वाढत चालल्याचे दिसत आहे.

सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत ४२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते. यातील चार पॉझिटिव्ह आढळून आले असून दोन संदिग्ध आले आहेत. उर्वरित ३६ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये एक तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दिवटी) दुसरा भूम तालुक्यातील इडा, तिसरा नाळीवडगाव तर चौथा लोहारा तालुक्यातील फणेपूर येथील आहे.

दरम्यान माळुंब्रा येथे आढळून आलेल्या करोनाबाधित महिलेचा सोमवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्याही आता सातवर पोहचली आहे. दरम्यान, आजचे दोन रुग्ण पूर्वीचेच पॉझिटीव्ह असून ते सोलापूर येथे उपचार घेत असून तुळजापूर तालुक्यातील आहेत. सोलापूर येथे पॉझिटिव्ह आलेले असून ते उस्मानाबाद जिल्ह्यात वर्ग झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

जिल्ह्यात २२ जूनपर्यंत करोनाबाधितांची संख्या १८३ वर पोहचली असून १३६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर ४० जणांवर उपचार सुरू असून सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.