अहिल्यानगर: बिगरशेती कायद्यातील सुधारणा नियमांचे उल्लंघन करून, सातबारा उताऱ्यात विनापरवाना फेरफार केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमधील चौघा महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे तसेच तत्कालीन तहसीलदारांची चौकशी करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती उपलब्ध झाली.
सुमारे वर्षभरापूर्वीचे हे प्रकरण आहे. तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी (घुलेवाडी) भीमराज शांताराम काकड, मंडलाधिकारी वैशाली अंबादास मोरे, तलाठी कोमल दत्तात्रय तोरणे व महसूल सहायक वसंत निवृत्ती वाघ या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर तत्कालीन तहसीलदारांची चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
संगमनेर नगरपालिका हद्दीतील तसेच गावठाणातील ४२ ब, ४२ क व ४२ ड अन्वये आकृषक आकारणी परवानगी सनद पूर्ण क्षेत्रासाठी असताना महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून मंजुरी नसताना, भूमिलेख विभागाच्या उपअधीक्षकांकडून कमीजास्त पत्रके प्राप्त झालेली नसताना, महसूल कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे घेतलेले फेरफार व मंडल अधिकाऱ्यांनी ते प्रमाणित केल्यामुळे कायदेशीर गुंतागुंत तयार झाली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी करणे क्रमप्राप्त झाल्याचे पत्र विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ८५ (२) मधील तरतुदी व महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत, त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ या कायद्याचा भंग करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाचा भंग केल्याने निलंबन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आदेशात नमूद केले आहे.
यासंदर्भात वर्षापूर्वी तत्कालीन तहसीलदारांच्या कारभाराविरोधात तक्रारी झाल्या होत्या. त्याची चौकशी तत्कालीन प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी केली होती व त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता.