पंढरपूर : माउलींच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ उत्साहात पार पडले. तर, दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे बाजीराव विहिरीजवळ उभे रिंगण रंगले. पालखी सोहला आता पंढरीच्या समीप येऊन पोहोचला असून शनिवारी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत. पंढरी नगरी वैष्णवांच्या मांदियाळीत अर्थात भाविकांच्या भक्तिसागरात न्हाऊन निघणार आहे.
माउलींची पालखी भंडीशेगावमधील मुक्काम आटोपून आज पुढे मार्गस्थ झाली. वाखरीजवळील बाजीराव विहिरीजवळ शेवटच्या गोल रिंगणाचा सोहळा रंगला. या ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविक दुपारपासून दाखल झाले. मोठ्या लवाजम्यासह माउलींची पालखी रिंगणाच्या ठिकाणी पोहोचली. त्यानंतर मोठ्या दिमाखात माउलींचे अश्व रिंगणाच्या ठिकाणी आले. चोपदाराने इशारा करताच माउलींच्या अश्वाने दौड करत रिंगण पूर्ण केले. यानंतर जमलेल्या वैष्णवांच्या उत्साहाला उधाण आले. गोल रिंगणानंतर त्याच ठिकाणी रस्त्यावर उभे रिंगण झाले. या वेळी दुतर्फा जमलेले भाविक आणि त्या मधोमध अश्वाची दौड; या क्षणाचे हजारो भाविक साक्षीदार झाले. यानंतर माउलींची पालखी वाखरी येथे विसावली.
दुसरीकडे माउलींच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर बाजीराव विहीर येथे संत तुकाराम महाराजाच्या पालखी सोहळ्यातील उभे रिंगण रंगले. पंढरपूरपासून मोजक्याच अंतरावर असणाऱ्या तुकोबांच्या या रिंगण सोहळ्यास वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आधी पताकाधारी, त्यानंतर डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला वारकरी, पखवाजवादक आणि वीणाधारी यांनी रिंगणात फेरी पूर्ण केली. त्यानंतर चोपदाराचा अश्व आणि तुकोबांचा अश्व यांनी रिंगण वेगात पूर्ण केलं. यानंतर तुकोबारायांची पालखी वाखरी मुक्कामी पोहचली.
शनिवारी सर्व पालख्या पंढरीत
शनिवारी वाखरी येथे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर संत नामदेव महाराज हे परंपरेने वाखरी येथील सर्व संतांना पंढरीचे निमंत्रण देतात असे वारकरी संप्रदायात मानले जाते. या वेळी वाखरीत संत मुक्ताई, संत एकनाथ महाराज यांचे पालखी सोहळेही यात सामील होतात. त्यानंतर सर्व संत पंढरीकडे मार्गस्थ होतील. ज्या दिवसाची वाट पाहत पायी निघालेल्या भाविक आज पंढरीत येणार आहेत. ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा’ या अभंगाप्रमाणे पंढरी भक्तिसागरात न्हाऊन निघणार आहे.
मंत्री शेलार, राणे पालखी सोबत पायी
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे बाजीराव विहीर इथे माउलीच्या रिंगण सोहळ्यास उपस्थित राहिले. रिंगण सोहळा झाल्यावर येथील वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा मोह त्याना आवरता आला नाही. या नंतर माउलीची पालखी वाखरी इथे मुक्कमी मार्गस्थ झाली. या वेळी शेलार यांनी पायी चालत वारकऱ्यांसोबत टाळ ,भजन, करत सामील झाले. त्याचबरोबर मंत्री नितेश राणे यांनी देखील माउलीच्या पालखीचे दर्शन घेतले आणि पायी वारी केली.