मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत; गृहसंकुलांना पाण्याचा वेढा

वसई विरार भागात महिना भरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवार सकाळपासूनच वसईच्या भागात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे विविध ठिकाणच्या सखल भाग पाण्याखाली गेल्याने बहुतांश भागातील जनजीवन विस्कळीत झाले.

वसईत पूरस्थिती निर्माण होऊन काही दिवसांचा कालावधी उलटून गेला असतानाच यंदाच्या वर्षी वसई विरार शहर हे चौथ्यांदा पाण्याखाली गेले आहे. याममध्ये  वसईतील, सी कॉलनी, आनंदनगर, विशालनगर अंबाडीरोड, माणिकपूर, समतानगर, सातिवली नाका, गोखीवरे नाका, वसंत नगरी,  एव्हरशाईन रोड, १०० फुटी रस्ता, चुळणे, सनसिटी, मालजी पाडा, तर नालासोपारा येथील टाकी रोड, ओसवाल नगरी, आचोळे रोड, सेन्ट्रल पार्क गाला नगर, संतोष भुवन, विरार मधील ९० फुट रस्ता, मनवेल पाडा, संत नगर, मोहक सिटी,  डोंगर पाडा, बोळींज चंदनसार, मनवेलपाडा रोड विवा महाविद्यलय रस्ता, बोळींज व इतर भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. यामुळे याचा फटका येथील नागरिकांना बसला आहे.

वारंवार निर्माण होणारम्य़ा पूरस्थितीमुळे वसई विरार शहर हे सतत पाण्याखाली जाऊ लागले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर होऊ लागला आहे. यामुळे अनेक घरात, दुकानात पाणी जाऊन नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तर शहरातील वाहतूक सेवा सुद्धा ठप्प झाली आहे. रिक्षा बसेस या सुद्धा बंद ठेवण्यात आल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांना बाहेर पडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ लागल्याने शहर नियोजन व पालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वसई विरार भागात पावसाच्या जोर वाढला तरी तात्काळ पूरस्थिती निर्माण होऊ लागल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या मार्गातच अनेक अडथळे निर्माण झाल्याने वसईच्या सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचू लागले आहे. या साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना प्रवास करावा लागता या साचलेल्या पाण्यात अनेक वाहने बंद पडू लागली असल्याने वाहनांना धक्का मारावा लागत आहे. तर काही भागात पाणी भरल्याने सामानांची उचल ठेव करावी लागली.

वीज पुरवठा खंडित

मुसळधार पावसामुळे वसई विरार भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांची अनेक कामे अडकून पडली असल्याने नागरिकांचे विजेविना हाल होऊ लागले आहेत. गणेशोत्सव सुरु असल्याने वीज नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पावसाचा जोर अधिक असल्याने मंगळवारी नालासोपारा पूर्वेतील भागात एका  तरुणाला विजेचा धक्का लागून गंभीर जखमीझाल्याची घटना घडली आहे.