सांगली: भटक्या श्वानांच्या पाठलागापासून वाचण्यासाठी धावत असताना विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची वन विभागाच्या तत्परतेने सुटका करण्यात आली. आरग (ता. मिरज) येथे विहिरीतून बाहेर काढलेल्या कोल्ह्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

आरगेतील साई मंदिराजवळील पोपट पाटील यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी (रात्री) एका कोल्ह्याने चार भटक्या कुत्र्यांच्या पाठलागापासून बचाव करण्यासाठी उडी मारली. मात्र विहिरीस पायऱ्या नसल्यामुळे त्याला वर येणे अशक्य झाले. या घटनेची माहिती पाटील यांनी वनविभागास दिली.

वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल तुषार भोरे, फायका पठाण, पांडुरंग कांबळे, सचिन साळुंखे, भारत भोसले व किरण नाईक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला विहिरीत ट्रॅप केज ठेवण्यात आला, मात्र कोल्हा घाबरून सैरावैरा धावत असल्याने त्याला पकडणे कठीण झाले.

यानंतर सचिन साळुंखे यांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने कोल्ह्याला सुरक्षितरीत्या जाळीत पकडले. प्राथमिक तपासणीत कोल्हा निरोगी व आजारविरहित असल्याचे आढळले. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने त्याला त्वरित नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. मुक्त झाल्यानंतर कोल्ह्याने निसर्गात धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या उष्णतेची तीव्रता वाढल्याने पाणी व अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. त्यामुळे त्यांचे विहिरीत पडणे, अपघातात अडकणे अशा घटना वाढत आहेत. अशा वेळी नागरिकांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.