लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर: स्वतःच्या मल्टिस्टेट को-आॕपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत संचालक करतो, नोकरी लावतो, असे आमीष दाखवून बोगस कर्ज प्रकरणे तयार करून पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस सहकार विभागाचे उपाध्यक्ष तथा जनकल्याण मल्टिस्टेट को-आॕपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक राजेंद्र हजारे यांच्यासह तिघाजणांविरूध्द सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कट रचून खोटी कागदपत्रे तयार करणे व स्वतःच्या फायद्यासाठी वापरात आणणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा भंग करणे आदी आरोपाखाली राजेंद्र पुंडलिक हजारे (रा. बाळे, सोलापूर) यांच्यासह अमर विजय जाधव (रा. सीवूड इस्टेट, नेरूळ, नवी मुंबई) आणि यशवंत वसंतराव पाटील (रा. आॕचिड मेट्रो पोलीस एस. जी. बर्वे मार्ग, कुर्ला, मुंबई) या तिघाजणांविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमृत केशव पडवळे (वय ३५, रा. रामपूर खेडपाडा, घोलवड, ता. डहाणू, जि. पालघर) असे या गुन्ह्यातील पीडित आदिवासीचे नाव आहे. २०१४ पासून ते ४ फेब्रुवारी २०२२ या सुमारे आठ वर्षांच्या कालावधीत सोलापुरात जनकल्याण मल्टिस्टेट को-आॕपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याचे पडवळे यांनी स्वतः दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी वाचा- पालघर जिल्ह्यात विकासाची गंगा वाहणार, महिला सक्षमीकरण मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आदिवासींच्या जमिनी आदिवासींच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना लिलावाशिवाय थेट खरेदी करता येत नाहीत. हे माहीत असतानाही अशा आदिवासींच्या जमिनी कमी पैशांत लिलावाद्वारे खरेदी करण्यासाठी अमर जाधव, यशवंत पाटील आणि राजेंद्र हजारे यांनी संगनमत करून आणि कट रचून अमृत पडवळे या आदिवासीला प्रथम नोकरी लावतो, महिना २५ हजार रूपये देतो, मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचा संचालक करतो, अशी आमीष दाखविले. त्यानंतर कर्जत, डहाणू, चिखलखैरे येथील आदिवासींच्या जमिनी पडवळे यांच्या नावाने खरेदी केल्या. त्यासाठी स्वतःचा पैसा वापरला. त्यानंतर या जमिनी स्वतःला कमी भावात लिलावाद्वारे खरेदी करता याव्यात म्हणून प्रथम कर्जत येथील आदिवासी जमिनीवर फिर्यादी अमृत पडवळे यांच्या नावे कागदपत्रांमध्ये चुकीच्या नोंदी करून नियमबाह्य तातडीने एक कोटी १० लाख रूपये गहाण कर्ज जनकल्याण मल्टिस्टेट को-आॕपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून (सोलापूर) पडवळे यांच्या परस्पर मंजूर करून घेतले.

त्यानंतर हे कर्ज बनावट विथड्राल स्लिप व बनावट रक्कम हस्तांतरण पत्राच्या आधारे यशवंत वसंतराव पाटील यांच्या बँक खात्यात फिर्यादी पडवळे यांच्या परस्पर जमा केले. एवढेच नव्हे तर हजारे, पाटील व जाधव यांनी कर्जत येथील आदिवासी जमीन कवडीमोल भावात लिलावाद्वारे खरेदी करण्यासाठी पडवळे यांच्या परस्पर केलेले बनावट कर्ज प्रकरण थकीत (एनपीए-अनुत्पादक) करून त्याच्या अंमलबजावणीसाठी पडवळे यांना पनवेल येथील दिवाणी न्यायालयाची नोटीस पाठविली. पडवळे यांनी न घेतलेल्या एक कोटी १० लाख रूपयांच्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी पडवळे यांच्यावर दडपण आणले. यात त्यांचे नुकसान करून फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud loan case about land grabbing of tribal in palghar 3 people arrested in solapur mrj
First published on: 12-03-2023 at 19:02 IST